गुरूकृपाच्या ५९ लाख ४६ हजारांच्या थकबाकी प्रकरणाची समितीकडून चौकशी झाल्यानंतर अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. गुरुकृपाच्या या  प्रकरणामुळे महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे अडचणीत सापडले आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरूकृपा असोसिएटची बँक गॅरंटी परत केली म्हणून नगरसेवकांनी उपायुक्त रवींद्र देवतळे यांना चांगलेच धारेवर धरले. गुरूकृपाने दहा वष्रे काम पूर्ण करण्याऐवजी त्यापूर्वीच ते सोडल्याने पालिकेला आर्थिक भरुदड बसला.
गुरूकृपाकडून पालिकेला ५९ लाख ४६ हजार रुपये घेणे असताना उपायुक्त देवतळे यांनी संगनमत करून ७५ लाखाची बँक गॅरंटी परत का केली, असा प्रश्न उपमहापौर संदीप आवारी, संजय वैद्य व बलराम डोडानी यांनी उपस्थित केला होता. नगरसेवकांच्या या प्रश्नावर उपायुक्तांकडे काहीच उत्तर नव्हते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या समितीत महापौर, आयुक्त व स्थायी समिती सभापती आहे.येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.
एकदा का हे प्रकरण प्रतिबंधक विभागाकडे गेले की, त्याची सविस्तर चौकशी होईल, हा त्या मागील उद्देश आहे.सध्या या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.  चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार झाल्यानंतर तो प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. या अहवालात उपायुक्त रवींद्र देवतळे दोषी आढळून आले तर चांगलेच अडचणीत सापडणार आहे.