केंद्र क्रमांक ३४, ७५ आपले निवडणूक साहित्य घेऊन जावे.. चेस क्रमांक २४, महिला पोलीस नाईक यांनी त्वरित हजेरी लावावी अन्यथा त्यांची गैरहजेरी लावली जाईल.. मतदान केंद्राध्यक्ष वा मतदान अधिकारी हजर नसल्यास साहाय्यक मतदान अधिकाऱ्यांनी साहित्य घेऊन जावे.. मतदान यंत्राचे एखादे बटण काम करत नसल्यास यंत्र एकदा हलवून घ्यावे.. त्याखाली बसलेली लाखेची पूड हटल्यास ते योग्य पद्धतीने काम करेल.. मतदान यंत्र व्यवस्थित काम करत असून कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.. निवडणूक साहित्यात चुन्याची पिशवी टाकण्याचा विसर पडला आहे.. थोडय़ा वेळातच सर्वाना तिचे वाटप केले जाईल..
अशा एकामागोमाग एक सूचनांचा पाऊस मंगळवारी सकाळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक साहित्य वाटप करताना पडला. हाती पडलेल्या साहित्याची छाननी करून, त्यात काही त्रुटी असल्यास त्याचे निराकरण करत हजारो कर्मचाऱ्यांनी आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे निवडणूक शाखेच्या वाहनांद्वारे कूच केले. एखाद्या विवाह सोहळ्यात अखेरच्या घटिकेपर्यंत जी काही लगबग सुरू असते, त्या लगीनघाईची अनुभूती साहित्य वितरणावेळी आली.
नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान होत आहे. त्यात ४२१० मतदान केंद्रांचा समावेश असून त्यांची जबाबदारी तब्बल २३ हजार १५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर (राखीव धरून २६ हजार ३१३) सोपविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक केंद्रावर पोलीस दलातील कर्मचारी तैनात राहणार आहेत. मतदान केंद्रावर नियुक्त झालेले केंद्राध्यक्ष, अधिकारी, शिपाई यांच्या प्रत्येक गटाला मंगळवारी सकाळी मतदारसंघनिहाय निवडणूक साहित्य वितरणास सुरुवात झाली. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १७०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. शासकीय कन्या विद्यालय, त्र्यंबक रस्त्यावरील गोदावरी सभागृह अशा वेगवेगळ्या ठिकाणी मतदारसंघनिहाय हे साहित्य वाटप झाले. प्रत्येक ठिकाणची स्थिती एखाद्या लग्न सोहळ्याप्रमाणे राहिली. ध्वनिक्षेपकांवरून निवडणूक विभाग तसेच पोलीस यंत्रणा विविध सूचना करत होते. जे कर्मचारी वेळेवर पोहोचले नाहीत वा ऐनवेळी अनुपस्थित होते, त्यांच्या नावानिशी त्वरित हजर होण्याच्या सूचना देऊन गैरहजेरी लावण्याची तंबी दिली गेली. एकाच वेळी सांगितल्या जाणाऱ्या सूचनांमुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. प्रत्येक केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र, मतदार यादीची चिन्हांकित प्रत, फुलीचा शिक्का, प्रदत्त मतपत्रिका, आउटर पेपर रीळ, डिंक, ‘स्टॅम्प पॅड’, कागदी मोहोर, स्पेशल टॅग, सांविधानिक व असांविधानिक लिफाफे असे साहित्य एकत्रित स्वरूपात सोपविण्यात आले. हे साहित्य व्यवस्थित आहे की नाही, याची छाननी प्रत्येकाकडून केली जात होती. त्यात गोंधळाची परंपरा कायम राहिली. कोणाची डिंकाची बाटली सांडलेली तर कोणाकडे ‘स्टॅम्प पॅड’ नाही. कोणाकडे एकापेक्षा अधिक साहित्य आलेले. साहित्यातील या त्रुटी भरून काढण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होती.
मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट असे दोन भाग पडतात. हे यंत्र व्यवस्थिपणे काम करते की नाही, याची छाननी प्रत्येकाला करावयाची होती. चाचणी मतदानाद्वारे ही प्रक्रिया सुरू झाल्यावर सभामंडपात विशिष्ट प्रकारचा आवाज घुमू लागला. त्यात काही यंत्रांची काही विशिष्ट बटणे योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनेकांनी आपली यंत्रे घेऊन उपस्थित तंत्रज्ञांकडे धाव घेतली. अनेकांच्या यंत्राला ही अडचण येत असल्याचे पाहून तंत्रज्ञांनी बटण योग्य पद्धतीने या दोषाची कारणमींमासा केली. मतदान यंत्र सील करताना लाखेचा वापर केला गेला. सील उघडताना लाखेची पूड यंत्रावर पसरून ती बटणाच्या खाली गेली असण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्रावर पोहोचल्यावर या स्वरूपाची अडचण निदर्शनास आल्यास मतदान यंत्र हलवून घ्यावे, जेणेकरून लाखेची पूड बाजूला जाऊन बटण योग्य पद्धतीने काम करेल, असे तंत्रज्ञांकडून सांगण्यात आले. साहित्य वितरणाच्या गोंधळात यंत्रणेने चुन्याची पिशवी काही दिली नव्हती. काही ठिकाणी उशिराने ही बाब लक्षात आल्यावर पुन्हा चुन्याची पिशवी देण्याची व्यवस्था करण्यात आली.

प्रत्येक केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी चुन्याची पिशवी घेऊन जावी, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात आले. साहित्याची पूर्तता करता करता दुपार झाली. त्यानंतर घरून डबे घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी जिथे सावलीची जागा मिळेल तिथे भोजन आटोपले. हजारो कर्मचाऱ्यांचा ताफा निवडणूक यंत्रणेने उपलब्ध केलेल्या वाहनांद्वारे आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाला.