बिल-भाडे थकल्याने फिट्टमफाट

कळमनुरी नगरपालिकेकडे पाणीपुरवठय़ाच्या वीजबिलापोटी ७ लाख थकल्याने त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. परंतु पालिकेनेही वीज वितरण कार्यालयाकडे भाडय़ापोटी ३ लाख थकबाकी असल्याने महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकले. अखेर एकमेकांनी रकमेचा भरणा केला, तेव्हा कोठे वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आला, तसेच पालिकेनेही ठोकलेले कुलूप काढले.कळमनुरी शहराला इसापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. या बिलापोटी नगरपालिकेकडे सुमारे ७ लाख २१ हजार रुपये थकबाकी होती. देयक अदा न केल्याने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठय़ाचा वीजपुरवठा खंडित केला.
वीज खंडित होताच महावितरणला दिलेल्या जागेचे भाडे थकीत असल्याची जाणीव करून देत मंगळवारी पालिकेनेही कळमनुरीतील वीजवितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकले. थकीत रक्कम वसुलीसाठी दोन्ही कार्यालयांनी एकमेकांविरोधात केलेली ही कारवाई कळमनुरीत चांगलाच चर्चेचा विषय झाला होता.