जागतिकीकरणामुळे भौतिक तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने विकास होत आहे. देशाला तांत्रिक शिक्षणाची गरज असून विद्यार्थ्यांना तंत्रविद्येच्या माध्यमातून उद्योगशील व समृद्ध बनविण्याची आवश्यकता असल्याचे मत भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अकराव्या योजनेंतर्गत परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात मुलींच्या विस्तारित नूतन इमारतीचे भूमिपूजन व विस्तारित वाचनकक्षाच्या इमारतीचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. योगेश्वरी शुगर इंडस्ट्रिजचे अध्यक्ष अशोक सामत, संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम देशमुख, जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्ताप्पा ईटके, प्रा. सदाशिव मुंडे, संचालक विठ्ठल चौधरी आदी उपस्थित होते.
खासदार मुंडे म्हणाले, की देशाला सर्व दृष्टीने बलशाली बनविण्यासाठी तरुणांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा औद्योगिक तंत्रज्ञानक्षेत्रात उन्नती साधावी. वैद्यनाथ महाविद्यालय अत्याधुनिक सुखसोयींनी पूर्ण असल्याने अग्रगण्य ठरले आहे. भविष्यात या संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. सामत यांनी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी केले.