07 August 2020

News Flash

मानकापूर रेल्वे उड्डाणपूल रखडल्याने छिंदवाडा मार्गावर वाहतूक कोंडी

छिंदवाडा मार्गावरील मानकापूर रेल्वे फाटकावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल तयार होणे अतिशय आवश्यक झाले आहे. मात्र राज्य सरकार आणि रेल्वे

| November 27, 2012 01:16 am

छिंदवाडा मार्गावरील मानकापूर रेल्वे फाटकावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल तयार होणे अतिशय आवश्यक झाले आहे. मात्र राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाला विलंब होत असून त्याचा फटका येथून दररोज जाणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे.
छिंदवाडा मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वाहतूक असते. मात्र चेन्नई-दिल्ली रेल्वे मार्गावर दररोज ८० ते १०० गाडय़ा धावत असल्याने मानकापूर येथील रेल्वे फाटक दिवसातील बरेच वेळ बंद ठेवले जाते. यामुळे वाहनचालकांचे हाल होऊन वाहतुकीचाही खोळंबा होतो. सकाळी साडेसात ते साडेदहा आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वर्दळीच्या वेळेत कोराडी व खापरखेडा वीज केंद्रे, वेकोलिच्या पिपला, सिल्लेवाडा व सावनेर येथील खाणींतील कर्मचारी, कोराडी मार्गावरील दोन मोठय़ा शाळांचे विद्यार्थी व कर्मचारी, तसेच नागपूरहून दररोज कामासाठी कोराडीला येणेजाणे करणारे नागरिक यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. अपघाताची शक्यता असते ती वेगळीच.
ही समस्या लक्षात घेता या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारणे अतिशय आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेत, न्यायालयाने येथे उड्डाणपूल उभारण्याच्या आवश्यकतेची राज्य सरकार व रेल्वे प्रशासन या दोघांनाही जाणीव करून दिली होती. या कामातील अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काही दिवसांपूर्वी दिले. परंतु हे काम होईपर्यंत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रेल्वे फाटकापासून दोन्ही बाजूंनी ५० ते १०० मीटर अंतरापर्यंत पक्के रस्ते दुभाजक लावले जाऊ शकतात. वाहने एकाच लेनमध्ये जाण्याची शिस्त लावणे आवश्यक असून, रेल्वे फाटकाजवळ या नियमाचे उल्लंघन करून वाहने पुढे काढणाऱ्यांना दंड होणे गरजेचे आहे. सिंगल लेन पद्धत मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यासाठी १ ते २ महिने या ठिकाणी काही जादा पोलीस कर्मचारी नेमले जाऊ शकतील. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी या प्रश्नात लक्ष घातले तर येथील वाहतूक सुरळीत होण्यास बरीच मदत होईल.
दिवसातील ज्या वेळी सर्वाधिक वाहतूक असते (पीक अवर) त्या वेळी रेल्वे फाटकावर पोलीस तैनात असणे अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात नेमणूक असलेले पोलीस वॉक्स कूलरजवळील चहाच्या टपरीवर उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करण्याऐवजी कुणी ‘बकरा’ मिळतो का त्याची वाट पाहताना दिसतात. ४-५ पोलीस फाटकापासून एक किलोमीटर अंतरावरील कोराडी जकात नाक्याजवळ बसलेले असतात आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सावनेर मार्गावरील अवैध वाहतूक सुरू असते. यावर उपाय म्हणून वाहतूक नियमनाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
रेल्वे प्रशासनानेही येथील समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रेल्वे गाडीच्या येण्या-जाण्यासाठी लागणारा नेमका वेळ लक्षात घेऊन त्यानुसार रेल्वे फाटक बंद करणे किंवा उघडले जाणे महत्त्वाचे आहे. अनेकदा हे फाटक नाहक १५ ते २० मिनिटांसाठी बंद राहत असल्याने वाहनचालकांना मन:स्ताप होतो. रेल्वे फाटकाजवळच एखादे वाहन नादुरुस्त होऊन बंद पडल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली जाणे महत्त्वाचे आहे. पोलीस उपलब्ध नसतील, त्यावेळी तेथे तैनात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने वाहनांची बेशिस्त वाहतूक थांबवून वाहतुकीचा समन्वय साधायला हवा. याशिवाय दुचाकी वाहनांकरता वेगळा मार्ग निश्चित करण्यात आल्यास वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी बरीच कमी होऊ शकेल. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी लक्ष घातल्यास येथील वाहतुकीचे बऱ्याच प्रमाणात नियमन होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2012 1:16 am

Web Title: manakpur railway flyover work stoped transporat problems in chindwada road
टॅग Railway
Next Stories
1 बुलढाणा जिल्ह्य़ात शेतमालाची अवैध खेडा खरेदी, शासन सुस्त सोमनाथ
2 ‘महाराष्ट्र घडवणाऱ्या वसंतरावांना वैदर्भीय जनता विसरली’
3 जे. बी. विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम
Just Now!
X