शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात बांधण्यात आलेल्या ‘ट्रामा केअर सेंटर’च्या इमारत बांधकामात अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या असून त्या चुका कशा दुरुस्त कराव्या असा प्रश्न मेडिकल प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, ठेकेदाराने ही इमारत मेडिकल प्रशासनाला हस्तांतरित केल्यानंतरच या चुका स्थानिक पातळीवरच दुरुस्त केल्या जाणार आहे.
पंतप्रधान आरोग्य योजने अंतर्गत मेडिकलच्या नूतनीकरणासाठी २००७ मध्ये १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये राज्य शासनाने २५ कोटी द्यावे, असे ठरले होते. या १५० कोटींमध्ये मेडिकलमध्ये ‘ट्रॉमा केअर’ सेंटर बांधण्याचे ठरवण्यात आले. तीन-चार वर्षांने उशिरा म्हणजे २०१२-१३ मध्ये या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. ट्रामा केअर सेंटरच्या इमारत बांधकामासाठी १२ कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यासाठी मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीनेच ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीचा नकाशा तयार केला. त्यानुसार ही इमारत बांधण्यात आली. ही इमारत बांधल्यानंतर त्यात लहान-मोठय़ा तीसहून अधिक चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. जेव्हा नकाशा तयार केला तेव्हाच, या बाबी त्यामध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता होती. तेव्हा या बाबींकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. त्यामुळे या चुकीकडे तत्कालिन अधिष्ठात्यांसह समितीवरच दोषारोपण केले जात आहे.
ट्रॉमा केअर सेंटरची इमारत म्हणजे बंगला किंवा घर नव्हे. त्यात वैद्यकीय दृष्टीकोणातून कोणत्या सुविधा असल्या पाहिजेत, याचा विचार करावयास हवा होता. तो न केल्याने आता मात्र अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड करावी लागणार आहे. इमारतीच्या मुख्य दाराजवळ सात फूट उंच रस्ता तयार करण्यात आला असून जमीनीपासून त्याला योग्य उतार देण्यात आला नाही. त्यामुळे रुग्ण स्ट्रेचरने नेण्यास अडचणीचे ठरणार आहे. या इमारतीत पाण्याची कुठेही व्यवस्था करण्यात आली नाही. शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांच्या शरीराचे अवयव ठेवण्याची कुठलीही व्यवस्था नाही. इमारतीच्या खिडक्या एका ठराविक उंचीवर नाहीत. अतिदक्षता विभागासाठी एक विशिष्ट खोली बांधण्यात आली नाही. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी व्यवस्था नाही.
शस्त्रक्रियागृहात विविष्ट सोयींचा समावेश नाही. इमारतीत नको तिथे भिंती बांधल्या तर जेथे बांधण्याची आवश्यकता होती, तेथे बांधण्यात आल्या नाहीत. अशा अनेक चुका या इमारतीत आहेत. ही इमारत सहा महिन्यापूर्वीच बांधून पूर्ण होणे आवश्यक होते. आता कुठे या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे असले तरी वीज वितरण व्यवस्था व वातानूकुलीन व्यवस्थेचे काम व्हायचेच आहे. याला किमान आणखी एक महिना लागेल. यानंतर ही इमारत संबंधित ठेकेदार मेडिकल प्रशासनाला हस्तांतरित करणार आहे.

इमारत हस्तांतरित झाल्यानंतर त्रुटी दूर करणार
ट्रामा केअर सेंटरच्या इमारत बांधकामात अनेक चुका आहेत, हे मान्य असून ते नुकतेच निदर्शनास आले आहे. खरं तर या चुका व्हावयास नको होत्या. आता कुणावर खापर फोडण्यात काहीच अर्थ नाही. या चुका दूर केल्याशिवाय इमारतीचा वापरच करता येणार नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून ही इमारत हस्तांतरित करण्याची वाट बघत आहोत. एकदा ही इमारत हस्तांतरित झाली की, स्थानिक पातळीवर चुका दूर करू. या चुका दूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही. तसेच वेगळ्या निधीची तरतूदही करण्याची गरज नाही. आतापर्यंत ट्रॉमा सेंटर सुरू व्हायला हवे होते. पुढील दोन महिन्यात हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. अभिमन्यू निसवाडे (मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता)