महाराष्ट्रात मराठी भाषा केवळ संवादाचीच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक घटक असून या भाषेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आमची सारखी धडपड असते. मराठी भाषकांमध्ये राहण्याची आमची मानसिक भूक आम्ही या ना त्या पद्धतीने भागवत असल्याच्या प्रतिक्रिया बृहन्महाराष्ट्रातून नागपुरात चर्चासत्रानिमित्त आलेल्या संजय करंदीकर आणि विजया तेलंग या प्राध्यापकांनी व्यक्त केल्या.
बडोदा विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा. डॉ. संजय करंदीकर म्हणाले, बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेचे स्वरूप औपचारिक स्वरूपाचे आहे. म्हणजे ते घरगुती किंवा शालेय पातळीवर जुजबी स्वरूपाचे असल्याने एक औपचारिक बांधीलकी म्हणून आम्ही प्राध्यापक मंडळी त्याठिकाणी मराठी भाषा दिन साजरा करतो. मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषा हा जगण्याचा भाग असल्याने त्यात एक आस्था, जिव्हाळा असणारी प्रदेश भाषा असल्याने त्याला औपचारिक स्वरूप नाही. त्या ठिकाणी मराठीचे कार्यवापर क्षेत्र संकुचित व्हायला लागले आहे कारण महाराष्ट्राप्रमाणेच सीबीएसई आणि इतर प्रादेशिक भाषांचा प्रभाव मराठी कुटुंबांवरही आहे.
कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. विजया तेलंग म्हणाल्या, महाराष्ट्राबाहेर आम्ही राहत असल्याने आमची ओढ नेहमीच महाराष्ट्रातील सांस्कृतिक घडामोडींवर असते. परवा ‘हिंदू’कार भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आम्हालाही आनंद झाला. दूर असलो तरी मराठी लेखकाला पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला विशेष अभिमान वाटला. नेमाडेंना पुरस्कार मिळाला तेव्हा तेथील लोकांनी अभिनंदन केले. आम्हीही कन्नड भाषिकांना मिळालेल्या पुरस्कारांचे कौतुक करतो. ते आपसूकच होते. सांस्कृतिक सौहार्दपूर्ण वातावरणाचा अनुभव अनेकदा मी त्या ठिकाणी घेतला आहे.
दुसरे म्हणजे इतर प्रादेशिक भाषिकांच्या विरोधात महाराष्ट्रात जे काही अभद्र शब्द वापरले गेले तरी एक सांस्कृतिक परिपक्वता त्या भागातील मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये असल्याने आम्ही या राजकीय घडामोडींकडे लक्ष देत नसल्याचे डॉ. तेलंग यांनी आवर्जून सांगितले.

बृहन्महाराष्ट्रात संस्कृती समन्वयात अनेकदा अडचणी येत असल्याची खंत प्राध्यापकांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात एखाद्या हिंदी किंवा प्रादेशिक भाषकाला ‘तुमच्या कानाखाली आवाज काढीन’ अशी भाषा वापरली जात असेल तर त्याची तिखट प्रतिक्रिया बृहन्महाराष्ट्रात आम्हाला भोगावी लागते. संस्कृती समन्वयाचा जो काही प्रयत्न आम्ही करतो त्याला खीळ बसते, असे प्राध्यापक संजय करंदीकर म्हणाले.