मागील तीन वर्षांपासून जेएनपीटी कामगार वसाहतीतील महिलांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, एका महिन्यात दुप्पट पैसे देतो असे आमिष दाखवून पन्नासपेक्षा अधिक महिलांची फसवणूक केल्याचे प्रकरण गाजत होते. या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी फसवणूक झालेल्या महिला व फसवणूक करणारे यांच्या अनेक बैठका झाल्या. मात्र या बैठका निष्फळ ठरल्याने अखेरीस मंगळवारी न्हावा -शेवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जेएनपीटीतील कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ज्ञानेश्वर सोनावणे आणि सुनीता सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोनावणे यांचा मेहुणा असलेल्या मुकेश दत्तात्रेय मोरे या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. जेएनपीटी बंदरात नोकरी करणारे सोनावणे कुटुंबीय येथील कामगार वसाहतीत राहातात. सोनावणे यांची पत्नी व मेहुणा मुकेश यांनी जेएनपीटी कामगार वसाहतीतीलच महिलांना महिनाभरात रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात दोन ते अडीच हजार रुपयांच्या रक्कमा घेऊन त्यांनी महिनाभराने दुप्पट करून दिल्या जात असल्याने अनेकांचा सोनावणे यांच्यावर विश्वास बसला. यामुळे अनेकांनी दुप्पट रक्कमेसाठी लाखो रुपये जमा केले. परंतु काही महिन्यांनंतर पैसे मिळत नसल्याने गुंतवणूक करणाऱ्या महिलांना फसवणूक होत असल्याचे लक्षात येऊ लागले होते. मात्र सोनावणे जेएनपीटीत नोकरीला असल्याने पैसे मिळण्याची त्यांना आशा होती. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स चेक्सही त्यांना मिळाले होते. मात्र पैसे मिळत नसल्याने अखेरीस साधना सुरेश धीवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनावणे दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांना उरण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती तपास अधिकारी महेश भावीकट्टी यांनी दिली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी मुकेश मोरे याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.