मराठवाडय़ाच्या विविध प्रश्नी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. २५) मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या गेल्या १६ जूनला औरंगाबादेत पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत या प्रश्नी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच आता पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे चव्हाण यांनीही प्रयत्न करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याने या बैठकीचे आयोजन आता केले आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यकंटेश काब्दे, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष सोमनाथ रोडे आदींसह सर्वपक्षीय विधानसभा व विधान परिषदेचे जवळपास ६० आमदार गुरुवारी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहतील, अशी माहिती सोमवारी देण्यात आली. विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन केले आहे. राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, फौजिया खान, सुरेश धस, डी. पी. सावंत हे मंत्रिगणही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. १६ जूनला मराठवाडय़ाच्या राजधानीत झालेल्या बैठकीत विभागातील पाणी, उद्योगांसह वेगवेगळे रखडलेले व दुर्लक्षित प्रश्न, योजनांबाबत चर्चा झाली होती. या बैठकीला अशोक चव्हाण हेही उपस्थित होते.