कारगील युद्धात हुतात्मा जवान बालाजी माले यांच्या कुटुंबीयांनी स्वखर्चाने स्मारकाचे काम सुरू केले आहे.  रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे बालाजी माले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. मात्र, माले यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करूनही कोणीच पुढाकार न घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी १४ वर्षांनंतर स्वखर्चाने स्मारकाचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्मारक उभारणीच्या कामास ३ जुलैपासून सुरुवात करण्यात आली.
गावोगावी लोक लोकसहभागातून मंदिर व इतर धार्मिक स्थळे उभारतात. राजकीय पुढारी शहीद स्मारक उभारण्याच्या घोषणा करतात व विसरून जातात. गेल्या १४ वर्षांत माले यांचे स्मारक उभे राहावे यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.  किमान त्या परिसरातील लोकांनी अशा कामात पुढाकार घेण्याची गरज होती. मात्र कोणीच पुढे येत नसल्यामुळे हुतात्मा माले यांच्या  कुटुंबीयांनी स्वखर्चातून स्मारक उभारण्याचा निर्धार केला आहे.  ३ जुलै रोजी कामाला सुरुवात करण्यात आली. या वेळी रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. अवस्थी, पन्नगेश्वर कारखान्याचे अध्यक्ष किशनराव भंडारे, प्रा. सतीश यादव, जि. प. सदस्या ललिता हाणवते व माले कुटुंबीयातील सदस्य उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेणापूर ते पानगाव रॅली काढून बालाजी माले यांच्या स्मृतीस अभिवादन केले.