आगामी काळात भारत महासत्ता होईल या ध्येयाने प्रेरित होत महिला व युवा सक्षमीकरण केंद्रस्थानी ठेवत काही सामाजिक संस्थांनी खारीचा वाटा उचलत कामास सुरुवात केली आहे. येथील मायको एम्प्लॉइज फोरम संस्थेने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यवसायाभिमुख अभ्यास प्रशिक्षण वर्गामुळे ३०० हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेत ‘आयटीआय’सह शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध विभागांत हे प्रशिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीने सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मायको एम्प्लॉइज फोरम’ची स्थापना करत महिला, युवा, सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत विविध कार्यक्रमांची आखणी केली. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, कार्यशाळा सुरू असताना व्यवसायाभिमुख करण्यासाठी मोफत संगणकाचे प्राथमिक ज्ञान तसेच डीटीपी, भ्रमणध्वनी आणि वातानुकूलित यंत्रणादुरुस्ती आदी शासनमान्य चार महिन्यांचे व्होकेशनल प्रशिक्षण वर्ग सुरू केले. यासाठी बॉश इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असून आवश्यक शैक्षणिक साहित्य, यंत्रसामग्री पुरविली जाते. प्रशिक्षणार्थीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिकवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अधिकाधिक सराव करता यावा यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी दिवसांपेक्षा तासात वाढविण्यात आला. आजवर ६४० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला असून ३८२ प्रशिक्षणार्थीना विविध नामांकित कारखान्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच काहींनी छोटीमोठी दुकाने सुरू करत स्वयंरोजगाराला प्राधान्य दिले आहे. विशेष महिलांनी भ्रमणध्वनी दुरुस्ती प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेत सहा महिलांनी सिडकोसारख्या कामगार वस्तीमध्ये या व्यवसायाला सुरुवातही केली आहे. दरम्यान व्होकेशनल प्रशिक्षण वर्गाला मिळणारा प्रतिसाद पाहता संस्थेने ‘बॉश स्किल इंडिया’ची (ब्रिज प्रोग्राम) आखणी केली. या वर्गात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असे संवाद कौशल्य यासह पोशाख कसा असावा, एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वभावानुसार प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय कसा हाताळू शकते, काही सामाजिक नियमांसह अन्य गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. हॉस्पिटिलिटी, बीपीओ, कॉपरेरेट, वेगवेगळ्या शोरूम्स या ठिकाणी संभाषणचतुर व्यक्तींची गरज लक्षात घेता प्रशिक्षणाची आखणी केली आहे. त्याकरिता आवश्यक साहित्य, पोशाख आदी साहित्य संस्था मोफत देते.
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात बॉशने या संदर्भातील स्टॉल लावला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत या संपूर्ण उपक्रमाची माहिती घेतली. प्रशिक्षण वर्गाला मिळणारा प्रतिसाद, स्पर्धेतील स्थान पाहता राज्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतन संस्था, आयटीआय या ठिकाणी ‘ब्रिज प्रोग्राम’ सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यानुसार नाशिकच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये हे प्रशिक्षण सुरू झाले असून मुंबई आयटीआयकडूनही या संदर्भातील पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष अश्पाक कागदी यांनी दिली. युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, यासाठी संस्थेच्या मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, नाशिक किंवा ०२५३-२३७७२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

६०० हून अधिक जणांचा सहभाग
मायको एम्प्लॉइज फोरमच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मोफत व्होकेशनल प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. तसेच नुकताच ब्रिज प्रोग्रॅम सुरू करण्यात आला. सुरुवातीला मोफत म्हणून प्रशिक्षणार्थीकडून प्रश्नचिन्ह उभे केले गेले. मात्र शिकवण्याचा दर्जा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, आवश्यक शैक्षणिक साहित्याची मुबलकता, प्रशिक्षण कालावधी यामुळे परिसरातील ६०० हून अधिक विद्यार्थी, गृहिणी, तरुणांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
अश्पाक कागदी (अध्यक्ष, मायको एम्प्लॉइज फोरम)

अन्य उपक्रम
आदिवासी दुर्गम भागात मोफत औषध व्यवस्था
महिलांसाठी छंद वर्ग
पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे मोफत वितरण
बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार