अनेक नवी मुंबईकरांचा रविवारच्या सुट्टीचा बेरंग पाण्याने अचानक सुट्टी घेतल्याने झाला होता. सकाळी पाणी न आल्याने गृहिणींचा संताप शिगेला पोहचला होता. ठाणे आणि नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी शनिवारी फुटल्याने अनेक भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. यामुळे नित्यकर्मासह स्वयंपाकासाठी बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर बाटलीबंद पाणी मिळणे दुरापस्त झाले होते. याचा फायदा घेत अनेक दुकानदारांनी चढय़ा किमतीने त्याची विक्री सुरू केली होती.
ठाण्यासह नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मध्यवर्ती जलवाहिनी शनिवारी रात्री फुटल्याने नवी मुंबईतदेखील त्यांचे परिणाम जाणवले. रविवारी सकाळपासूनच ऐरोली, दिघा, कोपरखरणे, घणसोली इतर परिसरात पिण्याचे पाणीदेखील नळाला आले नाही. त्यामुळे संडेचा बेत आखलेल्या महिला वर्गाला मात्र पाण्यासाठी सकाळपासूनच वणवण करावी लागली. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने महिला वर्गाचा पारा मात्र चढला. पाण्याची संध्याकाळपर्यंत वाट पाहणाऱ्या नागरिकांनी मात्र दिवसभर पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेतला. दैनंदिन पाण्यासाठी तलाव आणि टँकरचा आधार घेतला. बाटलीबंद पाण्याच्या खरेदीसाठी दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसत होती. अनेक दुकानांबाहेर बॉटल संपल्याचे चित्र होते. संध्याकाळी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या नागरिकांना बाटलीबंद पाण्याचा अधिभार सोसावा लागला होता.

टँकर महागले, राजकारण्यांचे फोटोसेशन
अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने एकीकडे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले असतानच दुसरीकडे मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी आपले दरपत्रक मनमानी पद्धतीने वाढवले होते, तर राजकीय नेत्यांनी नवी मुंबईत महानगरपालिकेच्या पाश्र्वभूमीवर टँकरने प्रभागातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा करून सोशल मीडियावर स्वत:चे फोटोसेशन केले होते.
अधिक किमतीत विक्री
२४ तास पाणी मिळणाऱ्या सायबर सिटीतील नागरिकांना रविवारी पाण्यासाठी वणवण करावी लागली. छोटय़ा पाण्याच्या पॉऊचपासून ते अगदी १० लिटपर्यंतच्या मिनरल वॉटरच्या खरेदीसीठी रविवारी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत होती. दिघा परिसरात या बॉटल अधिक किमतीत विकण्यात येत होत्या. रात्री उशिरापर्यंत काही दुकानातील साठय़ाने तळ गाठला होता. दिवसभरात शीतपेयापेक्षा पिण्याच्या पाण्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर झाल्याने दुकानदार खूश होते.