राज्यातील यंत्रमागाच्या वीज दरवाढ विरोधातील आमदार सुरेश हाळवणकर यांची स्थगन प्रस्तावाची सूचना विधानसभा अध्यक्षांनी नाकारल्याने मंगळवारी यंत्रमाग केंद्रातील आमदारांनी विधानसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर सुरेश हाळवणकर, रशीद मोमीन, रूपेश म्हात्रे, आबु आझमी, मुक्ती महमंद शेख, दादा भुसे पाटील आदी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर येऊन निदर्शने केली.    
राज्यातील यंत्रमागाच्या वीज दरामध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. यामुळे यंत्रमाग उद्योगामध्ये गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. या वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज राज्यातील २६ जिल्ह्य़ांतील १०० ठिकाणी वीज बिलांची होळी आयोजित केली होती. तर यंत्रमाग केंद्रातील आमदारांनी विधानसभेत आवाज उठविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यंत्रमाग वीज दरवाढीच्या निषेधाच्या टोप्या घालून उपरोक्त आमदार आज विधिमंडळात आले होते.     
वीज दरवाढीविरोधात आमदार हाळवणकर यांनी स्थगन सूचना दिली होती ती सुरुवातीला अध्यक्षांनी स्वीकारली. पण नंतर ती नाकारली. अशातच अन्य प्रश्नांवरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यावर सभाध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे संबंधित आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली. नंतर सभागृहाच्या पायऱ्यावर उतरून निदर्शने केली.