भाजप नेते किरीट सोमय्या मांडत असलेल्या भ्रष्ट नेत्यांच्या यादीत नाव नसलेला नाशिक लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार असल्याचे सांगत मनसेने अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान साधले. येथील नामदार गोपाळकृष्ण गोखले वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाच्यावतीने आयोजित ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात गुरूवारी प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी मनसेची भूमिका मांडली. यावेळी विरोधकांवर टीका करण्यासाठी आपला नेहमीचा बाणा सोडत मनसेने भाजप नेत्याचा संदर्भ घेतल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आदी उपस्थित होते. डॉ. पवार यांनी मतदार संघातील विविध प्रश्न आणि ते सोडवणुकीसाठीच्या उपाययोजना मांडल्या. ग्रामीण भागात बहुतांश आजार हे दुषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळाल्यास आरोग्याचे अनेक प्रश्न सहजपणे सुटतील. शहरालगतच्या पाच गावांत जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. गावोगावी या स्वरुपाची व्यवस्था कार्यान्वित करण्याचा आपला मानस आहे. रोजगारासाठी तरुण वर्ग शहराकडे आकर्षित होत असल्याने ग्रामीण भागात वृध्द मंडळींची संख्या अधिक आहे. वयोवृध्दांना भावनिक आधार देण्याचा आपला प्रयत्न राहील. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून हे स्थलांतर रोखण्याबरोबर मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. नाशिक शहर ‘वाय-फाय सिटी’ करणे, शिक्षण, भारनियमनाच्या प्रश्नावर तोडगा काढून सुरळीत वीज पुरवठा करणे, ग्रामीण विकास आदी संकल्पना डोळ्यासमोर असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्याविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या दुहेरी भूमिकेविषयी बोलताना डॉ. पवार यांनी त्याचे खापर प्रसारमाध्यमांच्या माथी फोडले.
प्रदेश सरचिटणीस चांडक यांनी मनसे स्थापनेचा उद्देश पक्षाची ध्येय धोरणे, कामकाजाची चौकट याबद्दल माहिती दिली. किरीट सोमय्या यांच्या यादीत मनसे उमेदवाराचे नाव नसल्याचा उल्लेख चांडक यांनी केला. कार्यक्रमात मनसेने विरोधी पक्षातील उमेदवारांवर थेट कोणतेही आरोप केले नाहीत. परंतु, सोमय्या यांच्या यादीचा संदर्भ देऊन राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्याकडे अप्रत्यक्षपणे अंगुलीनिर्देश केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून मनसेला सुसंस्कृत व सुशिक्षित उमेदवार लोकसभेत पाठवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विक्री कर कायद्यांतर्गत नोंदणी करतानाच प्रत्येक उद्योग व व्यावसायिकांना रोजगारात भूमिपूत्रांना प्राधान्य देणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. तथापि, तसे होत नाही. मनसेने छेडलेल्या आक्रमक आंदोलनामुळे रेल्वे भरतीत मराठी मुलांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा चांडक यांनी केला.
प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश संयोजन समितीच्या निशिगंधा मोगल यांनी नमूद केला. आभार डॉ. वृन्दा भार्गवे यांनी मानले.