पदे घेऊन मिरविणा-या आणि पक्षकार्याकडे दुर्लक्ष करणा-या जिल्हय़ातील पदाधिका-यांची शुक्रवारी मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. मात्र पदाधिका-यांना नैतिकतेचे डोस पाजत असतानाच किल्लेदार यांच्या शेजारीच गुन्हेगारी प्रवृत्तीचे पदाधिकारी बसल्याचे पाहून कार्यकर्त्यांतून आश्चर्य व्यक्त होत होते.
    मनसेचे नेते राज ठाकरे यांची पुणे येथील सभा, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका या पार्श्र्वभूमीवर यशवंत किल्लेदार यांनी कोल्हापूर जिल्हय़ातील मनसेच्या पदाधिका-यांची बैठक घेतली. बंद खोलीत पदाधिका-यांशी त्यांनी चर्चाही केली. पदाधिका-यांनी जिल्हय़ातील वरिष्ठ पदाधिकारी, विविध ठिकाणचे शहरप्रमुख हे निष्क्रिय असल्याचे आणि पक्षसंघटनेऐवजी भलत्याच गोष्टीत रस घेत असल्याच्या उघड तक्रारी केल्या. वस्तुस्थितीची जाणीव झाल्याने किल्लेदार यांनी मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पदाधिका-यांची चांगलीच झाडाझडती घेतली. ते म्हणाले, पदे केवळ शोभेसाठी घेणा-यांना मनसेमध्ये स्थान नाही. काम करणार नसाल तर पक्षातून अर्धचंद्र देण्यात येईल. ही स्थिती येण्यापूर्वीच निष्क्रिय पदाधिका-यांनी सन्मानाने पद सोडावे, कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, पदाधिका-यांनी आपल्या कामांचा अहवाल सादर करावा. त्याचा आढावा घेतल्यानंतर गच्छतीचा निर्णय घेतला जाईल.
    राज ठाकरे यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत गट अध्यक्ष (पोलिंग एजंट) नियुक्तीचे काम रखडल्याबद्दल कोल्हापूर जिल्हय़ातील पदाधिका-यांची कानउघडणी केली होती. त्याचा संदर्भ घेऊन किल्लेदार यांनी गट अध्यक्ष निवडीचे काम गतीने व्हावे, अन्यथा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून घरी बसविण्यात येईल, असा इशारा दिला. पुणे येथे होणा-या राज ठाकरेंच्या सभेसाठी जिल्हय़ातून तीन हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.