शासनकडून अनुदान दिले जात असले तरी आणि घरात शौचालय नसल्यास निवडणूक लढविता येणार नसल्याची भूमिका घेऊन देखील नाशिक जिल्ह्यातील ३८.०४ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यातील २८.०७ टक्के कुटुंबांच्या घरात शौचालये नाहीत. खान्देशातील धुळे व जळगाव जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महत्वाची बाब म्हणजे, शौचालये नसणाऱ्या बहुतांश कुटुंबातील एका तरी सदस्याकडे भ्रमणध्वनी आहे. म्हणजे, भ्रमणध्वनी जितका गरजेचा वाटतो, तितके शौचालय निकडीचे वाटत नाही. या मुद्यावर बोट ठेवत हागणदारी मुक्तीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी चांदवडच्या तरुणाने गावोगावी भ्रमंती करत तब्बल ५० हजार पत्रकांचे वाटप केले आहे.
सार्वजनिक स्वच्छतेच्यादृष्टिने व्यापक जनजागृती होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिवस जाहीर केला आहे. हा दिवस कधी आला अन् कधी गेला ते ग्रामीण भागात कोणाच्याही गावी नाही. उघडय़ावर शौचास बसल्याने अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊन कित्येकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा वापर करावयास हवा, हा संदेश पोहोचविण्यासाठी चांदवड येथील सुनील भिकाजी अहिरे हा तरुण गावोगावी भ्रमंती करत आहे. घरची किरकोळ शेती व छपाईचा व्यवसाय सांभाळून तो जसा वेळ मिळेल तसा शौचालय जागृतीचा गठ्ठा घेऊन ग्रामीण भागात दारोदार फिरतो. आतापर्यंत ७० खेडय़ांमध्ये फिरुन त्याने या संदर्भातील ५० हजार पत्रकांचे मोफत वाटप केले आहे. या उपक्रमात काही ग्रामस्थांना सहभागी करण्यात त्याला यश मिळाले. लग्नपत्रिकेत याबद्दलचा संदेश छापण्यास काहींना राजी केले. नांदगाव तालुक्यातील कैलास अहिरे यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत ‘शौचालय बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल दारोदारी’ असा संदेश प्रसिध्द केला. हागणदारी मुक्तीवर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे त्याने ग्रामीण जनतेला समजेल अशी स्वतंत्र पत्रके त्याने छापून घेतली.
भालुरच्या एका शिक्षकाने या संदेशाचे महत्व लक्षात घेतले. त्याच्या घरात शौचालय नव्हते. पडीक विहीर होती. पडीक विहिरीच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे ठरविले. आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्याचा शौचालयासाठी आता ते पुनर्वापर करतात. ही कल्पना त्यांना सुनीलने सुचविली. शौचालयासाठी शासन ९,१०० रुपये अनुदान देते. काही भागात या अनुदानाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्याचे सुनीलने सांगितले. अनेक कुटुंबांनी शौचालय बांधण्याऐवजी हे अनुदान गवऱ्या, सरपण व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी छोटेखानी खोली बांधण्यासाठी वापरले. ही बाब चुकीची असून रोगराई पसरू नये यासाठी प्रत्येक घरात शौचालयाची कशी आवश्यकता आहे हे तो पटवून देत आहे. काही घरात शौचालय असले तरी त्याचा वापरच केला जात नाही. अशा कुटुंबांची संख्या मोठी असल्याचे या भ्रमंतीत निदर्शनास आले. शौचालय नसल्यास निवडणूक लढविता येणार नाही, अशी टोकाची भूमिका घेऊनही नाशिक जिल्ह्यात ३८ टक्क्यांहून अधिक कुटुंबांच्या घरात शौचालय नाही. ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे भ्रमणध्वनी आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक सदस्याकडे भ्रमणध्वनी आहे. परंतु, शौचालय नाही, अशी दयनीय स्थिती असल्याकडे त्याने लक्ष वेधले.

गंमतीदार आणि विचित्र अनुभव
या जनजागृतीपर उपक्रमात सुनील अहिरेला ग्रामीण भागात अनेक गंमतीदार आणि विचित्र अनुभव आले. पिण्यासाठी पाणी नाही तर शौचालयाला कुठून आणणार, असा प्रश्न अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी उपस्थित केला. काही ग्रामस्थांच्या मते आम्हाला ‘ओपन एअर’ची सवय आहे. घरातील शौचालयात शौचालाच होत नाही तर काही जणांनी आपण जिथे राहतो, तिथेच शौचास बसायचे का, असा प्रश्नही विचारल्याचे अहिरेने सांगितले. या ग्रामस्थांना पटेल अशा भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. शौचालयात जाण्याची सवय लागली की हे प्रश्न आपोआपच सुटतील हे प्रत्येकाला समजावून द्यावे लागले.