उरणमधील सर्व सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे इंटरनेट व मोबाइल फोन नॉट रिचेबल झाले असून इंटरनेटला रेंज असतानाही नेट चालत नसल्याने तालुक्यातील नेटकरी व कार्यालयीन कर्मचारी त्रस्त झाले आहेत. खाजगी कंपन्यांकडून वायरलेस नेट सुविधा मिळत असली तरी अनेकांच्या वायरलेस नेटला रेंजच मिळत नसल्याने अनेकांची काम रखडली आहेत. तर संपर्कासाठी असलेले दोन-दोन मोबाइलही रेंज नसल्याने बंद पडत असल्याने आधीच दरात वाढ झाली असताना कॉलड्रॉपच्या संख्येतही वाढ झाल्याने मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत.
एमटीएनएल व बीएसएनएल या सरकारी कंपन्यांकडून समाधानकारक टेलिफोन तसेच इंटरनेटची सुविधा पुरविण्यात अडचणी येत असून या कंपन्यांकडून ‘सरकारी काम सहा महिने थांब’असे अनुभव ग्राहकांना आले आहेत. त्यामुळे अनेकांनी खाजगी इंटरनेट व मोबाइलची वाट धरली आहे. उरण तालुक्यात या खाजगी कंपन्यांचे जाळे पसरले असून सर्व कंपन्यांचे टॉवर आहेत. असे असताना मागील आठवडाभरापासून मोबाइल तसेच नेटसाठी वापरण्यात येणाऱ्या फोन तसेच डोंगलना रेंजच मिळत नसल्याने अनेकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. रेंज असूनही नेट अ‍ॅक्सेस होत नसल्याने धावपळ करावी लागत आहे.
या संदर्भात अनेकांनी मोबाइल कंपन्यांच्या हेल्पलाइवर संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे प्रशांत पाटील या तरुणाने सांगितले. त्यामुळे सरकारी एमटीएनएलच बरी होती अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. याचा परिणाम सध्या गल्लोगल्ली असलेल्या टॉकटाइम रिफीिलग करणाऱ्यांच्या व्यवसायावरही पडू लागला आहे. तसेच अनेक बँकांत इंटरनेट बंद असल्याने ग्राहकांना त्यांना आवश्यक असलेली माहिती मिळत नसल्याचे मत भारत पाटील या ग्राहकाने व्यक्त केले आहे.