संजय गांधी, श्रावणबाळ, अपंग, विधवा, वृद्धापकाळ आदी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी शिवसेनेने आमदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.
दुपारी १२ वाजता जाधव यांच्या संपर्क कार्यालयापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. संजय गांधी, श्रावणबाळ, अपंग, विधवा, वृद्धापकाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बठक दर महिन्याला होणे गरजेचे आहे. मात्र, २००९ पासून बठक झाली नाही. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. तहसील कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी, तसेच दलालांच्या संगनमताने बनावट लाभार्थ्यांचा यादीत समावेश केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अंतर्गत मतभेदामुळे निराधार योजनेच्या समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी रखडल्याचा आरोपही जाधव यांनी केला. निराधारांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर वेतन दिले जात नाही. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतांश लाभार्थ्यांचा उदरनिर्वाह मिळणाऱ्या अनुदानावर चालतो. मात्र, तोही नियमित मिळत नाही. निराधार लाभार्थ्यांचे पुनर्निरीक्षण करून अनुदानाचे तत्काळ वाटप करावे, अशी मागणीही जाधव यांनी केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, मनपातील सेनेचे गटनेते अतुल सरोदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, संदीप भंडारी, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, झरीचे माजी सरपंच गजानन देशमुख यांच्यासह कार्यकत्रे, निराधार योजनेचे लाभार्थी मोर्चात सहभागी झाले होते.