पतीचे किंवा आईवडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनाही निवृत्तीवेतन लागू होते. मात्र अनेकांना ही माहितीच नसल्याने निवृत्तीवेतनाची सुमारे साडेसहा हजाराहून अधिक बँक खाती मुंबई विभागात बंद पडली आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी विभाग पुढाकार घेण्यात आला आहे. ज्यांच्या कुटुंबाचे निवृत्तीवेतन बंद झाले आहे, त्यांच्या वारसांनीही वांद्रे येथील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याची पत्नी किंवा महिला असल्यास तिचा पती आणि त्यांची २५ वयापर्यंतची दोन मुले यांना निवृत्तीवेतन मिळते. पण ही बाब अनेकांना माहीतच नसते. किंवा कुटुंबातील महिला कमी शिकलेल्या असल्यास भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात व बँकेत जाऊन कागदपत्रे सादर करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याचे निधन झाल्यावर ते निवृत्तीवेतनाचे खाते बंद पडते. कर्मचाऱ्याने दरवर्षी आपल्या हयातीचा दाखला सादर करायचा असतो. तो दिला न गेल्यासही निवृत्तीवेतन थांबविले जाते. अशा विविध कारणांमुळे मुंबईत सुमारे साडेसहा हजाराहून अधिक बँक खाती गेली दोन-तीन वर्षे बंद आहेत व त्यात काही रक्कमही अडकली आहे.
त्यामुळे आता मानवतेच्या भूमिकेतून मुंबई विभागाचे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के.एल. गोयल यांनी या बंद पडलेल्या बँक खातेधारकांचा शोध घेण्याच्या सूचना कार्यालयास व संबंधित बँकांनाही दिल्या आहेत.