समुद्राच्या महाकाय लाटांपासून संरक्षण करण्यासाठी बांधबंदिस्तीचे काम चार वर्षांपासून रखडल्याने त्याचा फटका उरण परिसरातील ७०२ हेक्टर जमिनीला बसत आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळून त्याचे पाणी शेतजमिनीत शिरत असल्याने जमिनी नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१५ पर्यंत होता, परंतु बंधारा बंदिस्तीचे काम केवळ ५० टक्केच झाले असल्याचे येथे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
उरण येथील शेतकऱ्यांनी अपार मेहनत करून हजारो हेक्टर भातशेतीची निर्मिती केली आहे. या भातशेतीचे समुद्राला येणाऱ्या महाकाय लाटांपासून संरक्षण करण्यासाठी मोठमोठे बांध बांधले आहे, परंतु सध्या हे बांध कमकुवत झाल्याने समुद्र उधाणाच्या भरतीमुळे व महाकाय लाटांनी हे बंधारे फुटून समुद्राचे खारेपाणी भातशेतीत शिरून शेकडो हेक्टर जमीन नापिकी होण्याच्या मार्गावर आहे. यावर उपाय म्हणून खारलँड विभागाने २०१२ पासून खोपटे ते कोप्रोलीदरम्यान चार कोटी रुपयांचे सात किलोमीटरच्या बांधबंदिस्तीचे काम हाती घेतले होते. बंधाऱ्याचे काम जून २०१५ पर्यंत कंत्राटदाराने पूर्ण करावयाचे होते. परंतु मध्यंतरी निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने कंत्राटदाराला कामाचे पैसे वेळेत मिळत नव्हते, त्यामुळे बंदिस्तीचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. आज निधी उपलब्ध असून सध्या कंत्राटदाराकडे मजूर नसल्याने कामच बंद पडले आहे. याचा फटका परिसरातील ७०२ हेक्टर जमिनीला बसला असून जमीन नापिकी होण्याच्या मार्गावर असल्याची भीती खोपटे, कोप्रोली तसेच मोठीजुई येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली आहे.
 एकदा भातशेतीत पाणी शिरले की पुढील किमान तीन ते चार वर्षे शेतकऱ्याला या शेतीत पीक घेता येत नाही, अशी माहिती खोपटे येथील शेतकरी पंढरीनाथ ठाकूर यांनी दिली आहे. तसेच तीन वर्षे शेती पूर्ववत करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे मजूरही मिळत नाहीत, मिळालेच तर ते परवडत नाही अशा अवस्थेत येथील शेतकरी सापडला आहे. उरण तालुक्यातील पंधरा ते वीस किलोमीटर अंतराची बंदिस्ती असून खोपटापासून कोप्रोलीपर्यंतच्या सात किलोमीटरवर खारलँडकडून खर्च केला जात आहे. तर उर्वरित बंधारा खासगी पद्धतीने दुरुस्त केला जात असल्याची माहिती पेण येथील खारलँडचे शाखा अभियंता एस. जी. पोतदार यांनी दिली आहे. पावसाळ्यात बंदिस्तीचे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे पोतदार यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू होणार असल्याने चार महिने येथील शेतीवर समुद्राच्या पाण्याचे व त्यातही पावसाच्या पाण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती मोठीजुई येथील शेतकरी मितेश पंडित यांनी व्यक्त केली आहे.
जगदीश तांडेल, उरण