पावसाळ्यात स्वच्छ पाण्यात अंडी घालणारे डास मलेरिया आणि डेंग्यू पसरवून आरोग्याची समस्या निर्माण करत असतानाच हिवाळ्यात गटारे व नाल्यांच्या घाणीत पदास होणारे करोडो क्युलेक्स डास मुंबईकरांना हैराण करत आहेत. मुंबईकरांनी डासांचा संबंध केवळ पावसाशी जोडला असला तरी प्रत्यक्षात हिवाळा हा डासांच्या पदाशीसाठी सर्वात अनुकूल ऋतू आहे. चिखलात उत्पत्ती होणाऱ्या या डासांपासून रोग पसरत नसले तरी रात्रीच्या झोपेचे मात्र पुरते खोबरे होत आहे.

जगभरात डासांच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती असून देशात त्यापकी २५७ प्रजातींचे डास सापडतात. मुंबईत अ‍ॅनाफेलिस, एडिस आणि क्युलेक्स हे तीन जातींचे डास असून अ‍ॅनाफेलिसच्या पाच प्रजाती, एडिसच्या तीन प्रजाती तर क्युलेक्सच्या चार प्रजाती आहेत. अ‍ॅनाफेलिस हा डास मलेरियाचे तर एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यूच्या विषाणूंचे वहन करते. हे दोन्ही प्रजातींचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. क्युलेक्स प्रजातीचे डास मात्र घाणीच्या पाण्यात अंडी घालतात.
शौचकूप, नाले, दूषित पाणीसाठे, गटारे, गवताळ मदाने यात या डासांची पदास होते. या डासांना मारण्यासाठी पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाकडून नियमितपणे प्रयत्न केले जात असले तरी मलेरिया, डेंग्यूच्या भीतीने अ‍ॅनाफेलिस व एडिस डासांविरोधातील मोहिमेप्रमाणे या डासांविरोधात कोटय़वधी रुपये खर्च करणे शक्य नसते. तुंबलेले नाले, गटारे, शौचकूप यांमध्ये या डासांची पदास होत असल्याने मलनि:सारण विभागालाही या डासांच्या वाढीचे श्रेय जाते. सांडपाणी जोपर्यंत प्रवाही केले जात नाही तोपर्यंत या डासांच्या वाढीवर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. क्युलेक्सच्या प्रजातींपकी एक डास हत्तीरोगाच्या विषाणूंचे वहन करतो. मात्र शहरात रोगाचे विषाणू फारसे नसल्याने साथ पसरण्याचा धोका नाही.
मध्यंतरी एअरपोर्ट कॉलनीत एकाला हत्तीरोगाचा रुग्ण सापडला होता. त्या वेळी कीटक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध करून तेथील गवताळ मदानातील क्युलेक्स जातीचे डास शोधून काढले. या डासांमध्ये हत्तीरोगाचा विषाणू सापडला नाही, मात्र चिखल, सांडपाण्याप्रमाणेच गवताळ भागातही हे डास अंडी घालत असल्याचे निष्पन्न झाले. या डासांचीही वाढ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मात्र मुंबईकरांचे सहकार्य लाभल्याशिवाय ते कठीण आहे, असे कीटक नियंत्रण विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नािरग्रेकर यांनी सांगितले.

धूरफवारणी हा फक्त शेवटचा उपाय
डास वाढले की धूरफवारणी करण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधी सतत धोशा लावतात. मात्र धूरफवारणी हा शेवटचा व तात्पुरता उपाय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धुरातील कीटकनाशकाशी डासांचा दहा मिनिटे संपर्क आला तर डास निश्चित मरतात, त्यामुळे बंद जागेतील धूरफवारणी प्रभावी ठरते. मात्र मोकळ्या जागेतील धूर हा केवळ मनाला समाधान देतो. डासांची पदास रोखण्यासाठी पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या बंद ठेवणे, उघडय़ावर पडणारे पाणी प्रवाही ठेवणे, पाण्यात कीटकनाशक टाकणे असे उपाय करायला हवेत. धूर हा केवळ डोळ्यांना व मनाला समाधान देणारा उपाय आहे.