‘गवयाचे पोर गवईच होणार’ असे म्हटले जाते. पिढीजात आलेली कला व संस्कार नव्या पिढीत आपसूक रुजले जातात, हाच काय त्यामागील मथितार्थ. हा धागा पकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘हुनर से रोजगार’ या अभिनव प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यात ‘गाइड’च्या मुलांना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध संधींचे दालन त्यांच्यासाठी खुले करण्यात आले आहे. गाइडच्या पाल्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने गाइड बनविणारा हा उपक्रम आहे.
महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांच्या संकल्पनेतून ‘हुनर से रोजगार’ या उपक्रमास नुकतीच सुरुवात झाली. केंद्र व राज्य शासनाने त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत हाऊस कीपिंग, हॉस्पिटॅलिटी, फूड प्रॉडक्ट, बेकरी नॉलेज अशा विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे. हे सर्व प्रशिक्षण नि:शुल्क असून त्याकरिता आठवी उत्तीर्ण ही अट आहे. १६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १२ हजार रुपये शुल्क भरले. वेगवेगळ्या अडचणींमुळे अनेक तरुण शिक्षणापासून दुरावतात. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी ‘हुनर से रोजगार’ची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेला प्रारंभीच नाशिक विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता एकूण ४१ अर्ज आले होते. मात्र त्यातील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात तोरणमाळ, भंडारदरा, शिर्डी येथील गाइडच्या मुलांचा प्रामुख्याने समावेश होता. या विद्यार्थ्यांना शिर्डीत सहा आठवडे ‘हाऊस कीपिंग’ या विषयावर धडे देण्यात आले. ‘एमटीडीसी’ने शिर्डी येथील हॉटेलमध्ये मुलांच्या प्रशिक्षणाची मोफत व्यवस्था केली होती. प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या ध्वनी व चित्रफिती, माईक, प्रोजेक्टर अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रशिक्षणात आपल्याकडे आलेला पर्यटक कशा पद्धतीने टिकवून ठेवता येईल, यावर भर देण्यात आला. हाऊस कीपिंगसाठी आवश्यक संवादकौशल्य, कामातील नीटनेटकेपणा, व्यवसायातील मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत पर्यटन विकास महामंडळाकडून प्रशस्तिपत्र देण्यात आले. याचा लाभ प्रशिक्षणार्थीना पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांत होणार आहे. या माध्यमातून दुभाषक, गाइड किंवा पर्यटन क्षेत्रात स्वत:चा व्यवसायही सुरू करता येईल, अशी तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्याचे बडे-मिसाळ यांनी सांगितले. लवकरच ‘एमटीडीसी’च्या वतीने ‘फूड प्रॉडक्शन’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भात इच्छुकांनी नावनोंदणी वा अधिक माहितीसाठी पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब मैदानजवळ, नाशिक किंवा ०२५३-२५७००५९, २५७९३५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.