शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी गेल्यावेळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार व काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचा पराभव करून रामटेकवर भगवा फडकवला. मतमोजनीच्या पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. दीड लाखांहून अधिक मतांनी त्यांचा विजय झाला. या विजयामुळे जिल्ह्य़ातील शिवसेनेत पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे.
 विजयानंतर कृपाल तुमाने यांची ढोलताशाच्या निनादात व फटाक्यांची आतषबाजी करून विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सेनेच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही सहभागी झाला होता. कळमना मार्केटमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजनीला सुरुवात झाली. कुणाला किती मते मिळतात, याची सुरुवातीपासूनच सर्वानाच उत्कंठा होती. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ९ वाजता जाहीर झाला. पहिल्या फेरीत तुमाने यांना २६८०७ मते तर वासनिक यांना १९३५१ मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. पहिल्या फेरीतच तुमाने यांनी वासनिक यांच्यावर ५ हजार ८८९ मतांनी आघाडी घेतली. चौथ्या फेरीमध्ये तुमाने यांनी २२ हजार ३२९ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे विरोधकांमध्ये निराशाच बघावयास मिळाली. हीच बढत तुमाने यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. कधी सात हजार, कधी आठ हजार मतांनी त्यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. १७ व्या फेरीत त्यांनी १ लाख ४९ हजार १५१ मतांची आघाडी मिळाली होती. प्रत्येक फेरीनंतर सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत होता. मतमोजणीचे कल हाती येऊ लागताच येथे काँग्रेसचे कोणतेही मोठे नेते दिसून येत नव्हते. फक्त शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी मीडिया सेंटरला भेट देऊन पराभव मान्य करीत असल्याचे कबूल केले.
रामटेक लोकसभा मतदार संघात यावेळी बसपच्या किरण पाटणकर यांनीही दखल घेण्याजोगी मते घेतली. त्यांनी एक लाखाच्या जवळपास मते घेऊने सर्वानाच बुचकळ्यात टाकले. गेल्यावेळी बसपाचे प्रकश टेंभूर्णे यांनी ५५ हजार मते घेतली होती. निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश घेतला होता. परंतु त्यांचा वासिनक यांना कुठलाही फायदा झाला नाही, उलट बसपाच्या मतांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते.

लोकांचा विश्वास सार्थ करेन -तुमाने
मतदारांनी जो विश्वास दाखवला तो सार्थक करून दाखवेन अशी प्रतिक्रिया कृपाल तुमाने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्यावेळी मतदारांनी विश्वास दाखवला होता. तेव्हा थोडय़ाच मताने माझा पराभव झाला. पराभवानंतरही आपण मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सहकार्य लाभले. भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी यांनी साथ दिली. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मतदार संघात ठिकठिकाणी सभा घेतल्या, असेही तुमाने यांनी सांगितले.