राज्यातील बडय़ा शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था या कुत्र्यापासून कायमची मुक्ती मिळावी यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. नवी मुंबई पालिकेने यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला असून प्रत्येक प्रभागात महिन्याला ३०० भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया  करण्यात येणार आहे. नवी मुंबईत सध्या २९ हजार ८०० भटकी कुत्री आहेत.
भटक्या कुत्र्यांची दहशत शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी एकटय़ा रहिवाशाला रस्त्याने घरी किंवा कामावर जाणे मुश्किल झाले आहे. काही भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांच्या शरीराचे लचके तोडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्राणीप्रेमींनी वेळोवेळी उठवलेल्या आवाजामुळे न्यायालयाने कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्याचे निर्बीजीकरण करणे किंवा त्यांना शहरापासून दूर सोडणे या उपाययोजना कराव्या लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे पालिकेपुढे तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नवी मुंबईचे पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी भटक्या कुत्र्यांपासून नियोजनबद्ध शहर मुक्त करण्याला प्राधान्य दिले असून शनिवारी त्यांनी कोपरखैरणे व तुर्भे येथे जाऊन भटक्या कुत्र्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया व त्यांना पकडण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. नवी मुंबईतील ८९ प्रभागात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा पालिका विचार करीत असल्याचे पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांनी सांगितले. त्यासाठी पालिकेच्या विनावापरातील जागांचा वापर केला जाणार आहे. कुत्र्याचे मोठय़ा प्रमाणात निर्बीजीकरण करण्यासाठी एक कार्यशाळा घेतली जाणार असून तुर्भे येथील केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी आता ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जात असून ती एक हजापर्यंत वाढविण्यात येणार आहे. नवी मुंबईला नैसर्गिक मर्यादा आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढण्यासही मर्यादा आहे. पारसिक डोंगर आणि ठाणे खाडी यांच्यामधील भागात नवी मुंबई वसविण्यात आली असून इतर शहरांतील भटकी कुत्री या शहरात येणे शक्य नसल्याचे मत डॉ. झुंजारे यांनी व्यक्त केले. त्यामुळे नवी मुंबईत असणाऱ्या जवळपास ३० हजार कुत्र्यांचे युद्धपातळीवर निर्बीजीकरण हाती घेतल्यास वर्षभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कुत्र्यांचे पाच वर्षांत नैसर्गिक मृत्यू होऊन काही वर्षांने नवी मुंबई भटक्या कुत्र्यांपासून मुक्त होईल असा आशावाद डॉ. झुंजारे यांनी व्यक्त केला. त्या दृष्टीने एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून पालिकेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.