पतीच्या भांडखोर वृत्तीने त्रस्त पत्नीने मध्यरात्री झोपेत असलेल्या ७० वर्षीय पतीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण खून केला. अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात हा प्रकार घडला.
गणपत शंकर लांडगे असे मयताचे नाव आहे. लांडगे हे पत्नी सरस्वती (वय ६०) व मुलगा तुकाराम (वय २५) याच्यासह राहत. या दाम्पत्याला ५ मुली व १ मुलगा असून मुलींचे लग्न झाल्यामुळे त्या सासरी असतात. लांडगे यांच्या भांडखोर वृत्तीमुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असे. यातूनच काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्नीचा हात मोडला होता. पत्नीनेही पतीच्या पायावर दगड मारून जखमी केले होते. आई-वडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेला मुलगाही काही दिवस पुणे येथे जाऊन राहत होता.
बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाला वैतागलेला मुलगा नातेवाइकाकडे निघून गेला. मात्र, सरस्वती हिने रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगडी पाटा घातला. यात जखमी झालेल्या पतीने पुन्हा उठून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने विजेचा शॉक देऊन पतीला ठार केले. सकाळी स्वतच शहर पोलीस ठाण्यात येऊन केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वृद्धेला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.