किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये एका तरुणाच्या छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना अरण्येश्वर येथील जय मल्हार वसाहत येथे रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
वैभव दिलीप पंधारे (वय २४, रा. पर्वती, दर्शन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपावरून दशरथ विठ्ठल गिरे (वय ३०, रा. संतनगर, अरण्येश्वर) याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी सूरज तानाजी पवार (वय २०) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधारे व गिरे हे शिवदर्शन येथे शेजारी राहतात. मयत पंधारे व गिरे यांच्यात नेहमी कोणत्याना कोणत्या कारणावरून वाद सुरू होते. रविवारी दुपारी त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यामध्ये पंधारे याने गिरेला मारहाण केली होती. संध्याकाळी गिरे हा अरण्येश्वर येथील जय मल्हार वसाहत येथे नातेवाईकाकडे राहण्यासाठी गेला होता. त्या वेळी रात्री दहाच्या सुमारास पंधारे हा काही मित्रांना सोबत घेऊन त्याला मारहाण करण्यासाठी गेला होता. आपल्याला मारहाण करण्यासाठी आले या भीतीने गिरे घरातील चाकू सोबत घेऊन बाहेर आला. त्यांच्यात वादावादी सुरू झाली असता गिरे याने आपल्या सोबत आणलेला चाकू पंधारे याच्या छातीत खुपसला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पंधारे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गिरे याला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
अरण्येश्वर येथे तरुणाचा किरकोळ कारणावरून खून
किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये एका तरुणाच्या छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना अरण्येश्वर येथील जय मल्हार वसाहत येथे रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
First published on: 15-01-2013 at 02:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered in aranyeshwar for small reasion