विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस म्हटला की एरवी शहर विविध संघटनांच्या मोर्चानी दुमदुमत असते. वाहतूक खोळंबत असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतो. यावेळी मात्र दुसऱ्या दिवशी सभागृहात शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यावरून जोरदार चर्चा होऊन गदारोळ झाला असला तरी बाहेर मात्र एकही मोर्चा नसल्यामुळे शांतता होती. पोलिसांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने आजचा दिवस आरामदायी ठरला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वर्षोनवर्ष त्याच त्या मागण्या आणि तेच प्रश्न घेऊन विविध संघटनांचे मोर्चे विधानभवनावर धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांना केवळ मंत्र्यांच्या आश्वासनापलिकडे काहीच मिळत नाही त्यामुळे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणत त्याच मागण्या आणि तेच प्रश्न घेऊन मोर्चे काढले जातात. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघता अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात जास्तीत जास्त संघटनांचे मोर्चे विधानभवनावर धडकतात. पहिला आणि दुसरा दिवस पोलीस आणि प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय तापदायक असतो. मात्र, असे असताना यावेळी मोर्चा काढणाऱ्या संघटनांची संख्या कमी झाली की आणि नेते आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला, आहे हे कळायला मार्ग नाही.
गेल्यावर्षी अधिवेशनाच्या दोन आठवडय़ाच्या कामकाजामध्ये ६८ संघटनांचे मोर्चे विधानभवनावर धडकले होते. यावेळी मात्र केवळ अठरा मोर्चे आहेत त्यातही दुसऱ्या दिवशी एकही मोर्चा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिवेशनाचा पहिला आणि दुसरा दिवस हा पोलीस, नागरिक आणि प्रशासनासाठी फारच त्रासदायक असतो. पहिल्या दिवशी सहा संघटनाचे मोर्चे विधानभवनावर धडकले असून त्यात काँग्रेससह अन्य मोच्र्यातील संख्याबळ फारच कमी होते त्यामुळे एरवी पोलिसांवर मोर्चाचा असलेला ताण फारसा दिसून आला नाही. विधानभवनावर मोर्चे अडविण्यासाठी शहरात चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे त्यात सर्वात जास्त मोर्चे टेकडी आणि टी पॉईंट चौकात अडविले जातात. एलआयसी आणि सदर लिबर्टी चित्रपटगृहासमोर मोर्चे अडविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र त्या मार्गावर अजूनपर्यंत एकही मोर्चा आलेला नाही आणि तशी नोंद पोलिसांकडे नसल्याचे सांगण्यात आले.
विदर्भ विकलांग संघर्ष समितीतर्फे अपंगाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्या मागण्या सोडवाव्या आणि न्याय द्यावा अशी मागणी करीत आलेल्या अनेक अपंगांना रात्रभर कडाक्याच्या थंडीमध्ये टेकडी मार्गावर उघडय़ावर रात्र काढाली लागली. सारे मंत्रिमंडळ आणि प्रशासन नागपुरात असताना त्यांच्याकडे बघायला कोणालाच वेळच नसल्यामुळे संवेदनशीलता हरपली आहे की अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी टेकडी मार्गावर विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा अडविल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले आणि दरवर्षीप्रमाणे आश्वासन देऊन परतले. वर्षांनुवर्ष असाच प्रकार सुरू असल्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर नेत्यांमध्ये काहीच बदल होत नसल्यामुळे जोपर्यंत मंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी आलेला अपंगांचा मोर्चा दुसऱ्या दिवशी ठाण मांडून बसला होता.