उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली की, आपसुकच पाय वळतात ते शीतपेयांच्या दुकानांकडे. हा आनंद मिळविण्यासाठी शीतपेयांवर नागपूरकर करताहेत हजार-दोन हजार नव्हे, तर तब्बल कोटय़वधी रुपयांचा खर्च!
 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे नागपूर शहराचा अलीकडे चेहरामोहराच बदलून गेला आहे. सर्वच क्षेत्रात कॉपरेरेट कल्चरने घुसखोरी केली आहे. त्यामुळे जेवणाबरोबर पाणी पिणे जुन्या पद्धतीचे मानले जाऊ लागले अन् पाण्याची जागा घेतली ती शीतपेयांनी! प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार विविध कंपन्यांची थंड पेये बाजारात दाखल झाली. दरवर्षी फेब्रुवारी ते जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतचा काळ हा उन्हाळी हंगाम मानला जातो. याच काळात शीतपेयांची मागणी वाढते.
या हंगामात शहर परिसरात आठ लाख क्रेट (बॉक्स) शीतपेये विकली जातात, तर शहराच्या उपनगरांसह ग्रामीण भागात शहरातील विक्रीच्या तुलनेत चारपट शीतपेये विकली जातात. यात शहरालगतची पर्यटनस्थळे, प्रसिद्ध शाळा व महाविद्यालये यांचा समावेश आहे. दररोज सरासरी तीन हजार क्रेटची विक्री होते. त्यानुसार महिन्याला नव्वद हजार आणि हंगामातील चार महिने मिळून तीन कोटी छत्तीस लाख रुपये किमतीची शीतपेये विकली जात आहेत. एरवी वर्षभरही त्यांना मागणी सुरूच असते, मात्र उन्हाची तीव्रता वाढली की, त्यात लक्षणीय वाढ होत असल्याचे शीतपेयांचे वाहतूक व्यावसायिक संतोष साळुंखे यांनी सांगितले.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असल्यामुळे बहुतेक राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शीयपेयाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी कार्यकत्यार्ंना मिरवणूक, प्रचार यात्रा किंवा जाहीर सभेच्यावेळी शीतपेय विकत घेऊन घ्यावे लागत असे. मात्र, आता काळ बदलला असून विदर्भातील उन्हाळा बघता विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचा विचार करून व्यवस्था करू लागले आहे. त्यामुळे एरवी उन्हाळ्यामध्ये करोडो रुपयाची विक्री होत असताना निवडणुकीच्या काळात ती वाढली असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
 अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून विक्री वाढविण्याच्या स्पर्धेत शीतपेये तयार करणाऱ्या कं पन्यांकडून जाहिरातींसाठी बडय़ाबडय़ा फि ल्मस्टारपासून ते किरकोळ विक्रीवर आकर्षक भेटवस्तू देण्यापर्यंत सर्व प्रकारच्या क्लृप्त्या वापरल्या जातात. या बडय़ा कंपन्यांच्या तुलनेत देशी शीतपेये मात्र मागे पडलेली दिसत आहेत. ग्राहकाच्या आवडीचा अचूक वेध घेण्यास ही उत्पादने कमी पडताना दिसत आहेत. पुरेशा भांडवलाअभावी दर्जा असूनही देशी पेयांना शहराच्या बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळू शकले नाही. असे असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत सरासरी दोन ते अडीच लाख रुपयांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.