संसर्गजन्य आजाराने नगापूर जिल्ह्य़ात थैमान घातले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी नुकतीच अनेक गावांची पाहणी करून रुग्णांवर उपाय करण्याच्या सूचना केल्या.
कामठी तालुक्यातील खेडी या गावात साथरोगाचे २४ रुग्ण आढळून आल्याने ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येच आरोग्य खात्याची तारांबळ उडाली.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गोतमारे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याने आरोग्य खाते कामाला लागले. या निर्देशानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आणि कामठी तालुक्याचे खंड विकास अधिकारी आनंद पवार यांनी लगेच साथग्रस्त गावात जाऊन तेथील आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेत. खेडी या गावामध्ये साथरोगाची लागण झाल्याचे कळताच आरोग्य खात्याने खेडी या गावात ३० ऑक्टोबरपासून सर्वेक्षणास सुरुवात केली. त्यात हगवण व पोटदुखीचे २४ रुग्ण आढळून आले. या गावातील नळयोजनेची विहीर नाल्याच्या काठावर असून ती दूषित झाल्याने हा प्रकार घडल्याचे सर्वेक्षणात उघड झाले. या गावामध्ये २४ तास दोन वैद्यकीय अधिकारी व ६ कर्मचारी ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर सद्यस्थितीत पाणी पुरवठा करणाऱ्या दोन हॅन्डपंपचे शुद्धीकरण करण्याचे निर्देशही अध्यक्षांनी दिले आहे.
त्याचप्रमाणे पळसाद या गावात डेंग्यूचा एक संशयित रुग्ण आढळून आला. यानंतर या गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. त्यात गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली तसेच घरातील पाण्याचे साठे रिकामे करून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच या गावात फॉगिंग यंत्राद्वारे फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन पथक सतत लक्ष देत आहेत. तसेच २८२ घरांमध्ये ६२१ पाण्याचे साठे आढळून आले. त्यापैकी २१ घरी डासअळी आढळून आली. डासअळी आढळून आलेल्या पाण्याच्या साठय़ामध्ये टेमिफॉस द्रावण टाकण्यात आले.
सावनेर तालुक्यातील आजनी या गावात २२ ऑक्टोबरपासून डेंग्यू आजाराचे पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. उपाययोजना म्हणून गावातील नागरिकांच्या रक्ताचे नुमने तपासण्यात आले आहेत. ७ ठिकाणी डासअळी आढळून आल्याने टेमीफॉस द्रावण टाकण्यात आले आहे. आजनी गावातील नाल्याची जेसीबी यंत्राच्या सहायाने साफसफाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील ज्या गावात साथरोगाचे व अन्य रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर लगेच उपचार करण्याचे निर्देशही अध्यक्षांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.