मध्ययुगीन सरंजामशाही मूल्यांच्या चौकटीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे क्रांतदर्शी कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. भारतीय मानसिकतेत रुतून बसलेल्या शुभ-अशुभांच्या रुढी, कलियुगाची धारणा, क्षत्रीय व वैश्य वर्णाचा लोप, समुद्रगमन इत्यादी घातक विचारांचा फास तोडून शिवरायांनी सतराव्या शतकात एक महान सांस्कृतिक क्रांती केली, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी केले.
आसेगाव पूर्णा येथील छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
अनेक शतके तेजोहीन आणि हतवीर्य झालेल्या समाजात शिवाजी राजांनी स्वातंत्र्य या श्रेष्ठ मूल्याचे स्फूल्लिंग चेतवले. त्यासाठी ‘स्वराज्य हाच आपला स्वधर्म’ हे अग्नितत्व जनमानसात रुजवले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वदेशकार्यात एकत्र आणले. छत्रपतींनी स्वातंत्र्याची प्रेरणा फक्त मराठी मुलुखालाच नव्हे, तर तंजावरचा विजय राघव, मदुराईचा चोक्कनाथ, मेवाडचा राजसिंह, मारवाडचा जसवंतसिंह, तेलगू प्रांतातला भादण्णा यांनाही दिली. किंबहुना, त्यांच्यात आधीच असलेल्या प्रेरणेला अधिक प्रज्वलित केले, असे डॉ. रमेश अंधारे म्हणाले. स्वातंत्र्याच्या या प्रेरणेला शिवरायांनी धर्मप्रेरणेसोबतच अर्थप्रेरणेचीही जोड दिली. वतनदारांची पुंडाई नष्ट करून शेतसारा, शेतजमिनीची नवीन मोजणी, शेतीचे पुनर्वाटप, आदिवासी व दलितांना शेतीचे रयतवारी पट्टे देणे, अशा सुधारणा करून मराठी मुलुखाचा आर्थिक चेहरा आमुलाग्र बदलला.
स्वराज्याला सुराज्याचा प्राण देण्याचे कार्य शिवाजींनी आखलेल्या सप्तांग राज्यव्यवस्थेत दिसते. राजा, राष्ट्र, अमात्य, कोश, दुर्ग, सैन्य आणि परराष्ट्र धोरण, या सात विभागांच्या रचनेतून छत्रपतींचे क्रांतदर्शित्व दिसते, असे अंधारे म्हणाले.
महाराजांचा राज्य कारभार न्यायी, चोख व शिस्तबद्ध होता. अठरा कारखाने आणि बारा महाल यांची व्यवस्था पाहिली म्हणजे ‘वेलफेअर स्टेट’ कसे असावे, हे समजते. शिवाजींची लष्कररचना दुरंगी होती. त्यांनी गिरीदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग, अशा ३६० दुर्गाचे महाजाल उभे केले होते.
शिवाजींचे गनिमी काव्याचे युद्ध हे कपटयुद्ध नव्हते, असे सांगताना डॉ. अंधारे यांनी आपल्या व्याख्यानातून म.मो. कुंटे यांच्या ‘राजा शिवाजी’ या महाकाव्यापासून नुस्त्रतीच्या ‘अलीनामा’ व  ‘तारिखे इस्कंदरी’पर्यंत आणि आधुनिक काळातील ‘शिवाजी इन् भीमनगर मोहल्ला’, ‘सेवन्थ फलीट’ या नाटकापर्यंत शिवकार्याचा वस्तुनिष्ठ परिचय करून दिला.