सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही अद्याप आयोजन व नियोजनासंदर्भात राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि साधू-महंत यांच्यात कोणताही समन्वय आढळत नाही. हे सर्वच जण एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत असून त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असल्याने साधू, महंतांकडून एकाच वेळी सिंहस्थ कामासंदर्भात असलेल्या सूचना मागविण्यात याव्यात, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यंदाच्या सिंहस्थाची तयारी विविध कारणांमुळे गाजत आहे. साधुग्राम, शाही मार्ग हे वादाचे प्रमुख विषय ठरले आहेत. रस्त्यांची अनेक कामे करण्यात आली असली तरी तितकीच बाकीही आहेत.
प्रशासकीय यंत्रणा आपल्या पातळीवर सिंहस्थ कामांना वेग देण्याचा प्रयत्न करत असताना साधू, महंत, विविध आखाडय़ांचे प्रमुख वेगवेगळ्या सूचना व तक्रारी करून प्रशासनापुढील अडचणींमध्ये भर टाकत आहेत. एकेक सूचना करण्यापेक्षा त्यांनी एकाच वेळी लेखी सूचना, अपेक्षा, सोयीसुविधा व नियोजन कसे असावे, यासंदर्भात आपले मत प्रशासनास कळवावे. प्रशासनाकडूनही त्यांना यासंदर्भात एकाच वेळी सूचना कळविण्याचे पत्र देण्यात यावे, अशी सूचना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. भविष्यकाळात होणारे वादविवाद व संघर्ष टाळण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जमा होणाऱ्या साधूंमध्ये आपापसात मतभेद असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे ते एकमेकांवर टीकाही करतात. साधू, महंतांच्या आपापसात होणाऱ्या टीकेमुळे प्रशासनाचीही अडचण निर्माण होते. ही सर्व बाब लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील सिंहस्थाच्या नियोजनाविषयी साधू, महंत आणि आखाडाप्रमुखांकडून स्वतंत्रपणे लेखी सूचना मागविण्याची आवश्यकता आहे. जमा होणाऱ्या सर्व सूचनांपैकी योग्य सूचना ग्राह्य़ धरत प्रशासनाने नियोजन करावे. विधायक सूचनांचे प्रशासनालाही साहाय्यच होईल. अन्यथा साधू, महंतांचे मत विचारात न घेता कोटय़वधी रुपयांची कामे करूनही प्रशासनास टीकेचे धनी व्हावे लागेल. यंत्रणांमध्ये नियोजनाचा अभाव असल्यावर काय घडू शकते, हे मागील सिंहस्थात दिसून आले होते. चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ऐन वेळी घडणाऱ्या अशा घटनांना प्रशासन व पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले जाते. या सर्व बाबी टाळण्याकरिता प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि साधू, महंत अशा सर्वानी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर अविनाश आहेर, जितेंद्र दिवे, सूर्यकांत आहेर, चंद्रकांत बोंबले आदींची स्वाक्षरी आहे.