लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेतील सत्ताधारी मनसेने रखडलेले विषय मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू केली आहे. साधारणत: अडीच महिन्यांपासून गुंडाळून ठेवलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गुरुवारी अचानक नव्याने दिलेली गती, त्याचे निदर्शक ठरली. पाथर्डी फाटा ते वडनेर गेट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या मोहिमेचा श्रीगणेशा करताना अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्याचे सौजन्य दाखविले गेले नाही. यामुळे जेव्हा अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली, तेव्हा दुकानदारांची एकच तारांबळ उडाली. दुकानातील साहित्य आवरून घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता काढण्यात आलेल्या या मोहिमेबद्दल व्यावसायिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
काही वर्षांपूर्वी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. पालिकेची सत्ता हाती येऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटूनही विकासकामे करण्यात मनसेला अपयश आले आणि त्याची परिणती दारुण पराभवात झाल्याची मीमांसा राजकीय वर्तुळात केली जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत बदल करून महापौर व नगरसेवकांना नागरिकांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची तंबी दिली आहे. पालिकेत प्रभावीपणे काम न केल्यास त्याची किंमत आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल हे लक्षात आल्याने सत्ताधाऱ्यांनी सिंहस्थ कामांचा मुद्दा पुढे करून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली. गुरुवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे पथक जेसीबी, क्रेन अशी सामग्री घेऊन पोलीस बंदोबस्तासह पाथर्डी फाटा परिसरात धडकले. पाथर्डी फाटा ते वडनेर गेट या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रस्त्यालगत जवळपास १५ ठिकाणी विविध अतिक्रमणे असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
त्यानुसार पेंढारकर यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडवजा उभारलेल्या दुकानांकडे पथकाने मोर्चा वळविला. या कारवाईची व्यावसायिकांना पूर्वकल्पना नसल्याने पथक उभे ठाकल्याने ते हबकून केले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याकडे दुर्लक्ष करत पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू झाली. दोन टपऱ्या काढल्यानंतर माजी नगरसेवक संजय नवले यांनी धाव घेत या जागेवरील दुकाने रस्त्याची जागा सोडून असल्याचे सांगितले, परंतु अतिक्रमण पथकातील अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे दुकानदारांना आपले साहित्य स्वत:हून काढून घेण्याची मुभा द्यावी, ही मागणी अखेर पथकाने मान्य केली. दुकानदारांवर दादागिरी करण्यात आल्याचा आरोप नवले यांनी केला. अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यास काही अवधी मिळाल्याने मास्टर बॅटरिज्, ओम सायकल सव्‍‌र्हिस, कमला ट्रेडर्स, परफेक्ट ऑटोमोबाइल या दुकानांतील साहित्य हलविताना व्यावसायिकांची तारांबळ उडाली. दुकानातील साहित्य हटविल्यानंतर जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण हटविण्यात आले. या मार्गावरील अन्य अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढाकार घेतला. नोटीस न देता झालेल्या कारवाईबद्दल व्यावसायिकांनी रोष प्रगट केला. रस्ता रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेपासून आमची दुकाने आतमध्ये होती. पण ती हटवून पालिकेने नेमके काय साधले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी नोटीस देणे बंधनकारक नसल्याचा दावा पथकातील अधिकाऱ्यांनी केला.

रहिवासी क्षेत्रातील अतिक्रमणांना तूर्तास दिलासा
पावसाळ्याच्या कालावधीत रहिवासी क्षेत्रातील अतिक्रमणे काढली जाऊ नयेत, अशी सूचना राज्य शासनाने महापालिकांना केली असल्याने पुढील चार महिने या भागातील अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे. निवासी भागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे महापालिकेला या काळात काढता येणार नाही. त्यास पालिकेने दुजोरा दिला आहे.

‘शहरवासीयांनी मोहिमेला पाठिंबा द्यावा’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाथर्डी फाटा ते वडनेर गेट रस्त्याचे काम हा त्याचाच एक भाग आहे. विकास आराखडय़ातील या रस्त्याच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्यामुळे तेथील अतिक्रमणे हटविण्यात आली. आगामी काळात ज्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, तेथील अतिक्रमणे हटविली जातील. शहराला चांगले स्वरूप प्राप्त होण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा देणे आवश्यक आहे. पावसाळ्यास लवकर सुरुवात होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
– अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर