स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘कमला’ या काव्यसंग्रहातील ‘अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?’ या काव्यपंक्तीतून प्रखर राष्ट्रवाद अधोरेखित होतो. मात्र यातील गाभार्थ लक्षात न घेता महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी याकडे केवळ एक वार्षिक सोपस्कार यापलीकडे न पाहणाऱ्यांना त्याचे विशेष काही वाटेनासे झाले आहे. येथे सावरकरांनी सुरू केलेल्या अभिनव भारतचा कारभार सध्या अशाच पद्धतीचा झाला आहे. गुरुवारी सावरकर पुण्यतिथीची औपचारिकता आटोपल्यानंतर कार्यकारिणीने अभिनवचे कार्यालय कुलूपबंद ठेवत आपल्या दैनंदिन व्यवहाराला प्राधान्य दिले.
स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या देशकार्याची सुरुवात नाशिक येथील अभिनव भारतच्या माध्यमातून केली. इंग्रज सरकारच्या विरोधातील गुप्त कारवाया, खलबते, सावरकरांसह सहकाऱ्यांचा सहवास असलेले अभिनव भारत कार्यालय हे सर्व दृष्टीने भारतीयांसाठी विशेषत: नाशिककरांसाठी महत्त्वपूर्ण आहे. अभिनव भारतच्या वतीने सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यंदा या सर्व कार्यक्रमांनाा फाटा देत केवळ सावरकरांच्या प्रतिमेला सकाळी नगरसेवक शाहू खैरे, प्रा. गिरीश पिंपळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
या वेळी वाडय़ातील स्वातंत्र्यलक्ष्मीसमोर ‘सावरकर ज्योत’ पेटवत ती भगूर येथील सावरकरांच्या निवासस्थानी नेण्यात आली. कार्यक्रमाची ही औपचारिकता पार पाडल्यानंतर त्या निवासस्थानाला, कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. यामुळे नियोजित वेळेनंतर पोहोचलेल्या सावरकरप्रेमींवर कुलपाचे दर्शन घेण्याची वेळ आली. याविषयी अभिनव भारतचे व्यवस्थापक गोरे यांच्याशी संपर्क साधला असता, निवासस्थान दुपापर्यंत खुले होते. मात्र त्यानंतर आम्हाला आमची कामे असल्याने ते बंद करण्यात आल्याचे नमूद केले. त्या ठिकाणी अमूल्य ठेवा, महत्त्वाची कागदपत्रे असल्याने एखाद्याच्या भरवशावर ही वास्तू सोडता येत नाही. यामुळे ते बंद ठेवले. सायंकाळी कार्यालय व निवासस्थान पुन्हा सर्वासाठी खुले करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. व्यवस्थापकासह अन्य सदस्यांची आजच्या दिवसाबद्दल असणारी अनास्था, कुलूपबंद स्थितीतील निवासस्थान यामुळे अभिनव भारतचा सध्याचा कारभारही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.