आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेने कोणत्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याचा कृती आराखडा रेल्वे मंडळाला प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास सुरू असून प्रवासी केंद्रीत सुविधा देण्यास प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी दिली. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, रेल्वेकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी त्यांनी केली. मित्तल यांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकरोड व मनमाड रेल्वे स्थानकाचे रूप प्रशासनाने बदलवून टाकले. एरवी, प्रवाशांना सोई सुविधा देण्यास दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे विभागाच्या कारभाराने प्रवासी आश्चर्यचकीत झाले.
पुढील काही महिन्यात सिंहस्थ कुंभमेळ्यास नाशिक येथे सुरुवात होत आहे. या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. या काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे. कृती आराखडय़ाचा अभ्यास मंडळ करत आहे. आगामी सिंहस्थात प्रवासी केंद्रीत सुविधा देण्याकडे कटाक्ष दिला जाईल असे त्यांनी सूचित केले. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. नुकताच रेल्वे अर्थसंकल्प जाहीर झाला असल्याने त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. मनमाड रेल्वे स्थानकातील बंद स्वच्छतागृहावर तातडीने उपाय करण्याचे त्यांनी सूचित केले. रेल्वेच्या विविध कामगार संघटनांनी मित्तल यांची भेट घेतली. मित्तल स्थानकाला भेट देणार असल्याने नाशिकरोड, मनमाड रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी, सजावट, फुलांच्या झाडे, कारपेट, लोहमार्गात जंतुनाशक औषधाची फवारणी करून ते चकाचक करण्यात आले. रेल्वे अधिकारी आणि प्रशासनाची दिवसभर धावपळ सुरू होती.