रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा
गझलकार सुरेश भट यांच्या या ओळींचा प्रत्यय देणारा रंगोत्सव अवघ्या एक दिवसावर आला आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या आपत्तीचे रंगपंचमीच्या उत्सवावर सावट असले तरी शहरी भागात युवावर्गाचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. रंगात चिंब होण्यासाठी तरुणाई सज्ज आहे.
मागील काही वर्षे पाणी टंचाईमुळे कोरडी रंगपंचमी खेळण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी प्रबोधन केले होते. यंदा ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे या सणाचा फारसा उत्साह दिसत नाही. नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक रहाडींवर रंगोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. येवल्यात नेहमीप्रमाणे रंगांचा सामना रंगणार आहे. रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील बाजारपेठेत रंगाचे अनेक प्रकार वेगवेगळ्या पिचकाऱ्यांसह उपलब्ध आहेत. परीक्षेचा माहोल तसेच उन्हाचा तडाखा असल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह जेमतेम दिसत असला तरी रंगोत्सवाच्या पूर्वसंध्येला चित्र पालटेल अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. यंदाही बाजारपेठेवर चिनी साहित्याचे वर्चस्व असले तरी नैसर्गिक रंग वापराकडे अनेकांचा कल आहे.
नाशिक जिल्ह्यात फाल्गुन पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. नाशिककरांचा उत्साहाला उधाण आणण्यासाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध केले आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी प्रबोधन होत असल्याने रंगप्रेमींनी रासायनिक रंगाऐवजी पर्यावरणपूरक रंगाना प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन नैसर्गिक रंग १५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या वजनात उपलब्ध आहेत. युवकांची रासायनिक रंगाची क्रेझ पाहता डबीतील तसेच पुडीतील रंग ५० रुपयांपुढे उपलब्ध आहेत. यंदा बाजारपेठेत प्रथमच ‘जादुचा रंग’ दाखल झाला आहे. रंग हातावर लावून समोरच्याच्या गालावर लावेपर्यंत काही काळ तो राहतो, नंतर मात्र गायब होतो. हे या रंगाचे वैशिष्टय़े आहे. या रंगाच्या छोटय़ा बाटलीची किंमत ३० रुपये आहे. काही शाळांमध्ये नैसर्गिक रंग तयार करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे बच्चे कंपनीने घरी रंग बनविण्याचे प्रयोग केले.
मोठय़ांकडून रंगाची मुक्तहस्ते उधळण होताना बच्चे कंपनी मात्र यातून काहीशी दूर राहते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांना पिचकारी आवश्यक वाटते. लहानग्यांची ही आवड लक्षात घेऊन विविध प्रकारच्या कार्टुनच्या आकारातील पिचकाऱ्या २० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत तर, पारंपरिक पिचकाऱ्या आकारमानानुसार २० रुपयापासून २५० रुपयांपर्यंत आहेत. विविध आकारातील मासे, अँग्री यंग बर्ड, डोरोमन, छोटा भीम, स्पायडर मॅन, वाघ, साप, घडय़ाळ आदी प्रकारांच्या आकारात पिचकाऱ्या बाजारात आल्या आहेत. याशिवाय टँक आकारातील पिचकारी १२० रूपयांपासून ४५० रुपयापर्यंत, बंदूक २० ते जास्तीतजास्त अंतरावर पाणी फेकणारी बंदुक ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रंग आणि पिचकाऱ्यांच्या साहित्यात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. अजून ग्राहकांचा विशेष प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर उन्हाचा तडाखा आणि आता परीक्षेचा माहोल या कारणांमुळे ग्राहक अद्याप दुकानापर्यंत पोहचला नसल्याचे रंग विक्रेत्यांनी नमूद केले. मात्र, रंगपंचमीच्या दिवशी या स्थितीत बदल होईल अशी विक्रेत्यांना अपेक्षा आहे. शहरी भागात असा नूर असला तरी ग्रामीण भागात मात्र रंगपंचमी साजरी होण्याची शक्यता कमी आहे. अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रंगपंचमीची कोणतीही चाहूल नाही.