नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या काही वर्षांच्या कारभारात सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी केला आहे. कामांच्या नियोजित रकमेपेक्षा वाढीव कामांच्या निधीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची लुटमार सत्ताधारी करीत असून येत्या १९ जूनला सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट्राचारांच्या विरोधात शिवसेना व भाजप आंदोलन छेडून जनेतसमोर सत्य आणेल, असा इशारा नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिला. चौगुले यांनी ३० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा पुस्तकरूपाने पत्रकारांसमोर मांडला. तीस दिवसांचा वेध भविष्याचा या पुस्तिकेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा त्यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे नवी मुंबईमहानगरपालिकेचे रखडलेली रुग्णालयाची कामे, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम, अग्निशामन दलाच्या बहुउद्देशीय इमारतीचे काम त्याचप्रमाणे नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला आहे. सदरच्या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्ट्राचारा झाला असून सत्ताधाऱ्यांनी आधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार या कामांचा निधी वाढवून घेतला आहे. मुळात नियोजित वेळेत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना पालिकेने ते काम वेळेत पूर्ण न केल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशाची नासाडी होत असल्याचा आरोप चौगुले यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेले रुग्णालय आता ओस पडले असून येत्या काही दिवसांत या ठिकाणी नागरिकांना सुविधा न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून या कामामध्ये आमदार संदीप नाईक यांचा हस्तक्षेप वाढल्याने हे काम लांबणीवर पडल्याचा आरोप चौगुले यांनी केला. डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवनाच्या कामाकाजाचा लेखाजोखा येत्या महासभेत चर्चेला आणावा अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली असून महासभेत या विषयावर चर्चा न झाल्यास विरोधक महासभेमध्ये आंदोलन छेडतील, असे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये २० ते २५ वर्षांपासून कर्मचारी विविध विभागांत कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर सेवा करूनही भविष्य निर्वाह निधी मिळालेला नाही. या प्रकारात २०० ते ३०० कोटींचा घोटाळा झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.