नव्या महापौर-उपमहापौर निवडीची तारीख जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीने त्यादृष्टीने अपक्षांची मोट बांधल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. काँग्रेसशी त्यांची अजून बोलणी झाली नसली तरी सदस्यसंख्येच्या निकषानुसार राष्ट्रवादीने ही मोर्चेबांधणी केली आहे, मात्र त्यांच्यातच महापौरपदाचे दावेदार वाढल्याने याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मनपा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून म्हणजे मंगळवारपासुनच शहरात मनपा सत्तेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीत काँग्रेस आघाडीच आघाडीवर राहिली असून त्यातही १८ जागा जिंकून राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. स्वाभाविकच राष्ट्रवादी या मोर्चेबांधणीतही आघाडीवर राहिल्याचे समजते. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ २९ व पोहोचले असून बहुमतासाठी त्यांना ६ सदस्यांची गरज आहे. मनपात एकूण ९ अपक्ष निवडून आले असून त्यातील ६ ते ७ राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे समजते. हे सर्व अज्ञातस्थळी सहलीलाही रवाना झाल्याचे समजते. त्यांच्याच जोरावर राष्ट्रवादीने ३५ चा जादुई आकडा गाठल्याचे सांगण्यात येते. याशिवाय आणखी एक अपक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यांच्याबरोबर जाण्याच्या मन:स्थितीत आहे. तसे झाले तर राष्ट्रवादी पक्क्या बहुमताच्या दिशेने वाटचाल करील.
दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने ही सगळी मोर्चेबांधणी आमदार अरुण जगताप व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम या पिता-पुत्रांनी केली आहे. महापौरपदावर तेच दावा करीत असले तरी माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर व माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले गुरुवारीच दिल्लीला रवाना झाले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ते भेट घेणार असून कळमकर हे त्यांचा पुतण्या अभिषेक यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. घुले यांनीही त्याला पाठिंबा दिल्याचे समजते, मात्र यात काही मतमतांतरे आल्यास घुले यांच्या भावजयी नीता घुले यांचेही नाव पुढे करण्यात येणार असून त्यामुळे राष्ट्रवादीतच रस्सीखेच सुरू आहे. मात्र कळमकर-घुले यांच्या या हालचालींमुळे जगताप पिता-पुत्रही सावध झाले असून, त्यांनीही याबाबत शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. त्यानंतरच पुढच्या हालचाली केल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात येते.
भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेच्या मात्र अजुनही हालचाली सुरू आहेत. बरेचसे अपक्ष अज्ञातस्थळी रवाना झाल्याने त्यांची अडचण झाली आहे, मात्र मनसेच्या मदतीच्या प्रतीक्षेत ते आहेत. त्यांचा ओढा मात्र राष्ट्रवादीकडे असल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीने अपक्षांची मोट बांधली?
नव्या महापौर-उपमहापौर निवडीची तारीख जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीने त्यादृष्टीने अपक्षांची मोट बांधल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
First published on: 21-12-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp contact with independent