राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर होते.
टोपे म्हणाले की, अलीकडेच झालेल्या पक्ष संघटनेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपली या पदावर निवड झाली होती. त्यानंतर जि. प. निवडणुकीत पक्षाची थोडी पिछेहाट झाल्यावर नैतिक जबाबदारी म्हणून आपण या पदाचा राजीनामा देऊ केला होता. परंतु पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आपण पदावर राहिलो. आता जिल्ह्य़ातील सहकारी, शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या कार्यबाहुल्यांमुळे पक्षास आवश्यक तेवढा वेळ इच्छा असूनही देता येत नाही. त्यामुळे या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही. आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर जालना मतदारसंघातून लढविण्यास इच्छूक असून, त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात मागील पाच वेळेपासून भाजपचा उमेदवार निवडून येत असून इंदिरा काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा पराभव करायचा असेल, तर राष्ट्रवादीलाच उमेदवारी देणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.    

नवीन जिल्हाध्यक्ष कोण?
टोपे यांनी नवीन जिल्हाध्यक्ष पदासंदर्भात कोणाचेही नाव घेण्याचे टाळले. पक्ष जो काय निर्णय घेईल तो मान्य होईल, असे सांगितले. नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी निसार देशमुख यांचे नाव प्रदेश राष्ट्रवादीसमोर असल्याचे समजते. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील असलेले देशमुख हे अंकुशरावांचे समर्थक आहेत.