राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांना हटविण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यासाठी स्थानिक काही नेत्यांनी सह्य़ांची मोहीम सुरू केल्याची माहिती मिळाली. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे ही मोहीम सुरू झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीमधील अंतर्गत विरोध शिगेला पोहोचल्याचे चित्र येथे आहे. येथे ११ मे रोजी येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्यावर याचा विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
यंदा २७ फेब्रुवारी रोजी ग्रामीण अध्यक्षपदावर श्रीकांत पिसे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी काही वादग्रस्त नियुक्तया करून स्थानिक नेत्यांचा रोष ओढवला. पक्ष वाढीचे ध्येयधोरण नसणे व सर्वाना सोबत न घेता काम करण्याच्या त्यांच्या कार्य पध्दतीने ते अडचणीत सापडले आहेत. अशा विविध कारणांमुळे हा रोष पक्षांतर्गत पातळीवर वाढत आहे. पक्षात स्थानिक काही कार्यकर्ते व नेत्यांचा वाढता रोष पाहता जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दीडच महिन्यात त्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र झाली, हे विशेष. यात एका माजी मंत्र्यासह, एक माजी आमदार व प्रदेश पातळीवरील नेत्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीत निर्माण झालेला पेच अधिक दृढ झाला आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचे या मोहिमेस समर्थन आहे की नाही, याची माहिती मिळाली नाही.
जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे हे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा अकोला दौरा व या नेत्यांच्या पत्रकार परिषद याविषयी स्थानिक नेत्यांना अवगत करत नाहीत. नुकताच मंत्री अनिल देशमुख यांच्या दौऱ्यात याचा प्रत्यय पदाधिकारी व नेत्यांना आला. या गटबाजीची जाहीर चर्चा पत्रकार परिषदेत मंत्र्यांसमोर झाली. स्थानिक इतर नेत्यांना मंत्री व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्याविषयी माहिती न देणे, वरिष्ठ नेत्यांपासून नेत्यांना व कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, शहर अध्यक्ष अजय तापडीया यांना अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ ठेवणे, नव्याने पक्षात आलेल्या काही व्यक्तींना थेट विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन त्यांना कामाला जुंपणे, विशेष निरीक्षकांची नियुक्ती करताना स्थानिक वरिष्ठ नेत्यांना माहिती न देणे व संपूर्ण कार्यकारिणी जाहीर न करता काही सोयीस्कर अशा दोन-तीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करणे, असे विविध मुद्दे त्यांच्या विरोधात पक्षातील दुसऱ्या एका गटाने तयार केले आहे. त्यात बरेच तथ्य असल्याची चर्चा राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये होती. हे सर्व मुद्दे त्यांच्या विरोधात असून या मुद्यांच्या आधारे त्यांच्या विरोधातील हटाव मोहीम तीव्र झाली. या मोहिमेचे नेतृत्व नेमके कोण करत आहे, या विषयीची माहिती मात्र मिळाली नाही.
या मोहिमेमुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चर्चिली जात आहे. पक्षाच्या येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्यावर श्रीकांत पिसे हटाव मोहिमेचे तीव्र पडसाद पडण्याची चिन्हे आहेत. जिल्हाध्यक्षांनी पदाधिकारी मेळाव्यात स्थानिकांना डावलल्यास याचा परिणाम मेळाव्याच्या यशावर होईल. मुंगीलाल बाजोरीया शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात पक्षातील स्थानिक गटबाजीचे प्रदर्शन उघडपणे समोर येण्याची शक्यता राजकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे आता सर्वाची नजर लागली आहे. दरम्यान, यासंबंधी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षासाठी काम करत राहू, असे स्पष्ट केले. ज्या लोकांनी ही हटाव मोहीम सुरू केली त्या सर्वाना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पक्षाचा जिल्हाध्यक्ष असेल किंवा नसेल पक्षाच्या प्रती असलेला प्रेमादर कधीही कमी होणार नाही, असे मत श्रीकांत पिसे यांनी व्यक्त केले. या मोहिमेची माहिती नसून विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळावा यशस्वी करण्याकडे लक्ष असल्याचे ते म्हणाले.