महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसही आघाडीचा फेरविचार करून स्वबळावर लढेल, मात्र काँग्रेससमवेत आमची आघाडी झाल्यास जागावाटपात आमचेच वर्चस्व राहील. मागील वेळी काँग्रेसने आम्हाला हीन वागणूक दिली, त्या वेळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आता त्यांना आमच्याबरोबर यावे लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.
काकडे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय दौरे सध्या सुरू केले आहेत. रविवारी सायंकाळी नगर शहराचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी ते येथे आले होते. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान अर्ज मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मनपा निवडणुकीसाठी अजूनही आमची स्वबळाची तयारी आहे. मतविभागणी टाळण्यासाठी कार्यकर्ते आघाडीची चर्चा करतात, आघाडी करताना मागील वेळी काँग्रेसने जी वागणूक दिली तसे यंदा होऊ देणार नाही. काँग्रेसचे नेतृत्व, इच्छुकांची संख्या, त्यांची ताकद व राष्ट्रवादी यांची तुलना करूनच निर्णय घेतला जाईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सध्या बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीसाठी चांगले वातावरण आहे. पक्षाने केलेल्या पाहणीत नगरची जागा पक्ष जिंकेल असे आढळले आहे. पक्षाचे इच्छुक उमेदवार राजीव राजळे, दादा कळमकर, बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार यांना एकाच व्यासपीठावर आणून ते एकत्रच आहेत, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जात आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या पाठीशी आम्ही राहू, असा संकल्प ते करतात. निवडणुकीचे वातावरण व अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठीच हा दौरा आहे, हे मान्य करताना काकडे यांनी मतभेत कार्यकर्त्यांत नाहीत तर नेत्यांतच आहेत, तेही संपुष्टात येतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत १० ते १२ नोव्हेंबरला नगरमध्ये मेळावा घेतला जाणार आहे.