एखाद्या गुंडगिरीमय चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने शहरातील आयडिया महाविद्यालयात वाहनांमधून येत तोडफोड आणि महिला प्राध्यापकांना शिवीगाळ करणारे टोळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने कायदा व सुव्यवस्था पाळण्याची अधिक जबाबदारी त्यांच्यावर असताना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात बिहारप्रमाणे खुलेआम कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे या मंडळींकडून काढण्यात आल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नाशिककरांमध्ये उमटत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांसह इतर पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आधीच महाविद्यालय व्यवस्थापनाने केला आहे. पाल्यावर रॅगिंग झाल्याच्या तक्रारीवर चर्चेने सहजपणे मार्ग निघणे शक्य होते, असेही म्हटले जात आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय स्थानिक पातळीवर काही वर्षांपासून चांगलाच चर्चेत आहे. या मुद्दय़ावरून याआधी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत विरोधकांनी राष्ट्रवादीवर शरसंधान साधले होते. त्याची किंमत पक्षाला मोजावी लागली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, घडलेला तोडफोडीचा प्रकार पाहता राष्ट्रवादी इतिहासातून कोणताही बोध घेण्यास तयार नसल्याचे दर्शवीत आहे.
सातपूर येथील आयडिया महाविद्यालयात बुधवारी १५ ते २० जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत तोडफोड केली. त्यामागे वेगवेगळे संदर्भ असल्याचे सांगितले जात आहे. १५ ऑगस्टनिमित्त विद्यार्थी काही कार्यक्रमाचे आयोजन करीत होते. या वेळी एका विद्यार्थिनीकडे नावाची विचारणा करण्यात आली. माहिती विचारण्याची पद्धत योग्य नसल्याने ही बाब संबंधित विद्यार्थिनीला खटकली आणि ती महाविद्यालयातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी महाविद्यालयातून प्रवेश रद्द करवून घेतला. त्यानंतर काही वेळातच टोळके लाठय़ा घेऊन
महाविद्यालयात शिरले.
दगडफेक करीत काचा, खिडक्या, दरवाजांची तोडफोड करण्यात आली. काहींनी वर्गात शिरून महिला प्राध्यापकांना शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. हा संपूर्ण घटनाक्रम महाविद्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने तोडफोड करणारे कोण, हे समजणे महाविद्यालय व्यवस्थापन आणि पोलिसांनाही सहजशक्य झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी खैरे यांनी आपल्या पाल्यावर रॅगिंग झाल्याची तक्रार केली. तोडफोड करणाऱ्या मंडळींशी आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु पोलीस यंत्रणेने सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे ज्या सहा जणांना अटक केली. त्यात संशयित खैरे यांचे नातेवाईक व समर्थक असल्याचे निदर्शनास आले.
रॅगिंगचा विषय व्यवस्थापन व संबंधित यंत्रणेकडे तक्रार देऊन सोडविणे सहजशक्य होते. त्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ पालकमंत्र्यांच्या अगदी निकटचे समर्थक असणाऱ्या आणि राज्यात गृह खात्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रवादी या पक्ष पदाधिकाऱ्याच्या समर्थकांनी कायदा हातात घेऊन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना पुन्हा आयता विषय दिला आहे.
विरोधकांकडून राष्ट्रवादीवर करण्यात येणाऱ्या गुंडगिरीच्या आरोपांना पूरक असाच हा प्रकार घडल्याने पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची मात्र ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी स्थिती झाली आहे. राष्ट्रवादीतील बाहुबलींचे वर्तन पक्षाला नेहमीच मारक ठरत आले आहे. विधानसभा व महापालिका निवडणुकीत विरोधकांनी राष्ट्रवादीच्या गुंडशाहीवर बोट ठेवले होते. मनसेपासून इतर सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादीवर गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचे टीकास्त्र सोडले होते. बाहुबलींच्या सोबतीने राजकीय समीकरणे सहजपणे सोडविता येतात, असा राजकीय पक्षांचा समज आहे. यामुळे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांना स्थान देण्यास हे पक्ष उत्सुक असतात. मग गुन्हेगारी मंडळींना राजकीय वरदहस्त लाभतो आणि पक्ष मजबूत झाल्याचा आभास निर्माण होतो. पण ही बाब पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारी ठरते याचा धडा मात्र राष्ट्रवादीचे नेते अजूनही घेण्यास तयार नसल्याचे दिसते.

विद्यार्थी संघटना, इतर राजकीय पक्षांचे सोयिस्कर मौन
विद्यार्थ्यांशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर निवेदन काढण्यासाठी तत्पर असणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी आयडिया महाविद्यालयातील घटनेबद्दल सोयिस्करपणे मौन बाळगले आहे. कोणतीही विद्यार्थी संघटना तोडफोड अथवा रॅगिंग या विषयावर आपली भूमिका मांडण्यास पुढे आलेली नाही. महाविद्यालयात एखाद्या टोळक्याने या पद्धतीने धुडगूस घालणे म्हणजे आपण महाराष्ट्रात राहत आहोत की बिहारमध्ये, असा प्रश्न पडावा. छोटय़ा-मोठय़ा विषयावर आंदोलन करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या विद्यार्थी संघटना आयडिया महाविद्यालयातील प्रकारावर काही बोलण्यास तयार नाहीत. तोच प्रकार इतर राजकीय पक्षांबाबत म्हणता येईल. कोणत्याही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप याप्रश्नी भूमिका मांडली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तोडफोडप्रकरणी सहा जणांना अटक व जामिनावर सुटका
आयडिया महाविद्यालयातील तोडफोडप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री सहा संशयितांना अटक केली. महाविद्यालयात टोळक्याने चढविलेल्या हल्ल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले होते. याआधारे पोलिसांनी राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी आणि पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे, कृष्णा जाधव, सागर मोरे, संदीप खैरे, अमोल आव्हाड, किशोर शेवाळे यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदल्या दिवशी खुद्द दिलीप खैरे यांनी या तोडफोडीशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते.