शिवाजी पार्क मैदानातील ‘धुळवडी’ची कारणे शोधून काढणाऱ्या परिसरातील रहिवाशांनी त्यावरील उपायही सुचवला आहे. मात्र प्रशासकीय वेगाने हलणाऱ्या फायलींमुळे गेली दीड वर्षे तरी शिवाजी पार्कची समस्या सुटलेली नाही. पाण्याचे फवारे मारून माती खाली बसवण्याचा उपयोग तात्कालिक असून आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानाप्रमाणे हिरवळ केल्यासच त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले. 

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला घडवणारे मैदान, राज्याच्या राजकारणाला सभांमधून दिशा देणारे मैदान, २६ जानेवारीची परेड, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम, गणेश विसर्जनासाठी वाहने लावण्याचे तळ.. शिवाजी पार्क या सगळ्यांसाठी ओळखले जाते. धुळीचे वादळ उठवणारे मैदान अशीही त्याची ओळख निर्माण होऊ पाहत आहे. यासाठी कारणीभूत ठरत आहेत ती मैदानाच्या सपाटीकरणासाठी वापरली जाणारी लाल माती. शहरातील अनेक ठिकाणची मैदाने लाल माती वापरून गुळगुळीत केली जातात. मात्र या मातीचे योग्य व्यवस्थापन न केल्याने कोणती समस्या ओढवू शकते, त्याचे शिवाजी पार्क हे ठसठशीत उदाहरण. शिवाजी पार्कमधील मातीचे प्रमाण, त्यात खेळणारी शेकडो मुले यामुळे ही समस्या अनेकपटींनी वाढते.
ही माती उडू नये यासाठी त्यावर पाणी शिंपडणे आवश्यक असते. मात्र या मैदानावर पाणी शिंपडले तरी सकाळच्या दोन तासात मैदान सुकते आणि शेकडो मुलांच्या पाय आदळण्याने मातीचा थर हवेत घुसळायला लागतो. या मातीमुळे अनेक सूक्ष्म कण हवेत उडतात. हे अतिसूक्ष्म कण हवेत अनेक आठवडे राहू शकतात. डोळ्यांना दिसत नसलेल्या या कणांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे येथील कणांचे हवेतील प्रमाण तपासले जावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्याला यश आलेले नाही, असे डॉ. सुधीर पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात वॉर्ड अधिकारी शरद उघडे यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले. नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांच्याकडेही शिवाजी पार्क रेसिडन्ट असोसिएशनचे सदस्य तक्रार घेऊन गेले. मात्र याबाबत ठोस उपाय अजूनही काढण्यात आलेला नाही.
दक्षिण मुंबईत आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदानातही शेकडो मुले खेळतात. मात्र या मैदानावर हिरवळ करण्यात आली आहे. गवताची मुळे माती घट्ट धरून ठेवत असल्याने या मैदानांवर मातीचा त्रास होत नाही. शिवाजी पार्क मात्र याला अपवाद आहे. मातीचा जाड थर असलेल्या या मैदानातील माती मुलांच्या हालचालींसोबत हवेत उडत राहते.

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी मैदानाची पातळी समान करण्याच्या हेतूने माती टाकली जाते. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत होत असलेल्या बैठकीत या मातीमुळे स्थानिकांना होत असलेल्या त्रासाबाबत कल्पना दिली जाईल. शिवाजी पार्क या मैदानात वर्षभरात अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे तेथील मातीची समस्या उग्र आहे. मात्र स्काउट पॅव्हिलिअनजवळ लहान आकारात हिरवळ करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. संपूर्ण मैदानात अशा प्रकारे हिरवळ करण्यासाठी पाण्याचे फवारे (स्प्रिंकलिंग) लावण्याचा विचार आहे.
शरद उघडे,  सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग