News Flash

सामाजिक संवेदना जागृत ठेवणे आवश्यक

एचपीटी पत्रकारिता विभागातील 'मुक्त संवाद' सामाजिक संवेदना जागृत ठेवून, लोकांना विश्वासात घेतल्यास पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येणे शक्य असल्याचे अनुभवसिद्ध मत येथील महिला

| January 13, 2015 08:39 am

एचपीटी पत्रकारिता विभागातील ‘मुक्त संवाद’

सामाजिक संवेदना जागृत ठेवून, लोकांना विश्वासात घेतल्यास पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येणे शक्य असल्याचे अनुभवसिद्ध मत येथील महिला पत्रकारांनी मांडले. एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘मुक्त संवाद’ कार्यक्रमात अपर्णा वेलणकर, दीप्ती राऊत, वैशाली बालाजीवाले या पत्रकारांनी आपले अनुभव कथन केले.
पत्रकारितेत अनेक बरेवाईट अनुभव येत असतात. अशा वेळी लोकांना विश्वासात घेऊन काम करणे महत्त्वाचे असते. लोकांना बोलके करण्याचे, लोकांच्या मनाला भिडण्याचे कौशल्य पत्रकारांच्या अंगी असणे आवश्यक असल्याचे या पत्रकारांनी नमूद केले. वेलणकर यांनी मालेगाव सेक्स स्कॅण्डल, शाहरुख खानच्या मुलाखतीचे उदाहरण दिले. बालाजीवाले यांनी मालेगाव बॉम्बस्फोट तर, राऊत यांनी आदिवासींचे प्रश्न आणि कुष्ठरोग्यांचा सहवास अशी काही उदाहरणे दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने पत्रकारिता विभागाच्या प्रमुख प्रा. वृन्दा भार्गवे यांनी प्रश्न  विचारले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अनंत येवलेकर यांनी चर्चेचा समारोप केला.
क्लासचालक संघटनेचे
 साताऱ्यात राज्य अधिवेशन
नाशिक येथील प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशन १५ मार्च रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनास शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, सांगलीचे खासदार, आमदार, महापौर उपस्थित राहणार आहेत. क्लासचालकांनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. जयंत मुळे यांनी केले आहे.
अधिवेशनात खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी, शिकवणीला व्यवसाय म्हणून शासन मान्यता मिळावी, हे ठराव मांडण्यात येणार असून या व्यवसायातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शिकवणीची अधिकृत नोंदणी व परिषदेची स्थापना आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच २५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे शिकवणी घेणाऱ्या ११ शिक्षकांचा भीष्माचार्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भालचंद्र पाटील (९३७१९८७९३४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन
मालेगाव कॅम्प येथील पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. या वेळी गणेश बिरादर यांनी स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वसाधारण परिस्थितीतून बाहेर पडा, उच्च ध्येयाने प्रेरित व्हा, जिद्द व कष्ट करण्याची तयारी ठेवा, ध्येयाप्रत पोहोचणे सर्वाना शक्य आहे असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राध्यक्ष प्रा. बी. डी. पगार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. बी. सानप यांनी प्रास्ताविक केले.
‘फ्रावशी’ विद्यार्थ्यांकडून
पोलीस ठाण्याची पाहणी
नाशिक येथील फ्रावशी अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यास भेट देत तेथील कामकाजाची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक एस. पी. काळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काळे यांनी विद्यार्थ्यांना एफआयआर, बिनतारी संदेश यंत्रणा, गुन्हेगारांच्या नोंदी, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आदींबाबत माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले.
कोठारी इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यशाळा
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कोठारी इन्स्टिटय़ूटमध्ये ‘संशोधन निबंध लेखनाच्या पद्धती’ या विषयावर कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळेत सिम्बोयसीसच्या संचालिका डॉ. वंदना सोनवणे यांनी शोधनिबंधाचा परिचय, विश्वकर्मा इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. शैलेश कासवडे यांनी शोधनिबंध सादरीकरणाचे निकष याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. राजश्री गुजराथी यांनी साहित्याचा आढावा कसा घ्यावा, डॉ. स्मिता कचोळे यांनी शोधनिबंध सादरीकरणाचे महत्त्व पटवून दिले. प्रा. भावना शेट्टी यांनी अहवाल सादर केला. प्रा. अनुप मोहाडकर यांनी आभार मानले.
सावंत महाविद्यालयात चर्चासत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत नाशिक येथील जी. डी. सावंत महाविद्यालयातील वाणिज्य विभागांतर्गत ‘ग्राहक संरक्षण आणि ग्राहक कल्याण’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रास गोदावरी शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव अशोक सावंत यांनी ग्राहक कसे फसले जातात याविषयी माहिती दिली. ग्राहक राजामध्ये जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या वेळी प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल, उपप्राचार्य प्रा. के. व्ही. शेंडे, संस्थेच्या मुख्य अधिकारी टी. आय. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. दोनदिवसीय चर्चासत्रात प्रा. अरुण भार्गवे, डॉ. संजय तुपे, प्रा. दिलीप फडके, प्रा. डी. एस. पाटाडे, प्रा. दिनेश म्हात्रे, प्रा. सी. बी. चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. प्रा. के. एल. धवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अशोक बोडके यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:39 am

Web Title: need to be aware of social sensitivity
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 पर्यावरण जागृतीसाठी नाशिक-शेगाव सायकल यात्रा
2 ओझर विमानतळावरून प्रवासी वाहतुकीच्या दिशेने वाटचाल
3 .. तर मतिमंद, गतिमंद मुलेही आत्मनिर्भर
Just Now!
X