नेहा राजाध्यक्ष, वय वर्षे २६. छायाचित्रणाची आवड. हा छंद जोपासत ती एका स्वयंसेवी संस्थेतही काम करते. छायाचित्रांच्या माध्यमातून जगभराशी जोडले जावे यासाठी नेहाने इन्स्टाग्राम या सोशल साइटचा आधार घेतला.. आणि इथेच तिचा छळ सुरू झाला.
नेहाच्या प्रोफाइलवर अश्लील शेरेबाजी सुरू झाली. मे महिन्यातला हा प्रकार. नेहाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, शेरेबाजीचे प्रमाण वाढतच गेले. तिने संबंधित व्यक्तीचा प्रोफाइलच ब्लॉक केला. मात्र, त्या व्यक्तीने लगोलग दुसऱ्या प्रोफाइलवरून नेहाला त्रास द्यायला सुरुवात केली. नेहाने हाही प्रोफाइल ब्लॉक केला. पण समोरची व्यक्ती हार मानायला तयार नव्हती.
तिसऱ्या प्रोफाइलवरून त्याने नेहाला अश्लील शिव्या देण्यास सुरुवात केली. इन्स्टाग्रामवरचे आपले अकाऊंट बंद करायचे किंवा मग समोरच्या व्यक्तीला धडा शिकवायचा हे दोनच पर्याय नेहापुढे होते. तिने दुसरा पर्याय स्वीकारला. नेहाने थेट वांद्रे येथील सायबर सेलकडेच तक्रार नोंदवली. सायबर सेल पोलिसांनी सारा प्रकार समजावून घेतला. सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार मोरे यांनी नेहाला धीर दिला.
पोलिसांनी या बनावट प्रोफाइलवरून नेहाला छळणाऱ्या व्यक्तीचा आयपी अ‍ॅड्रेस शोधून काढला. इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क साधून त्या प्रोफाइलचा ई-मेल शोधला. ती व्यक्ती गुजरातमध्ये राहणारी होती. पोलीस थेट गुजरातला धडकले आणि त्याच्या मुसक्या बांधून मुंबईला आणले. आपल्याला पोलीस पकडूच शकणार नाहीत, या भ्रमात असलेल्या ‘त्या’ व्यक्तीची भीतीने गाळणच उडाली.
ज्या मुलीला तो शिव्या घालायचा त्या नेहाला समोर पाहून तो अक्षरश लटपटला आणि माफी मागू लागला. बँकेत काम करणारा हा मध्यमवयीन व्यक्ती असे धंदे करू शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्याच्या गयावया पाहून नेहाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल न करता केवळ समज देऊन त्याला सोडण्याचे ठरवले. पोलिसांनीही त्याला योग्य ती समज दिली. गुन्हा दाखल नसल्याने हा प्रकार रेकॉर्डवर नव्हता. पण काही दिवासंपूर्वी नेहाने आपल्या ब्लॉगवर या संर्पूण प्रकार मांडल्यानंतर ही बाब समोर आली.
नेहाच्या धाडसी पावलाचे आणि सायबर सेल पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. सायबर सेल पोलिसानी जे सहकार्य केले आणि ज्याप्रकारे आरोपीला शोधून काढले ते खरेच कौतुकास्पद आहे, असे नेहाने सांगितले.
कुणाला असा ऑनलाइन त्रास दिला जात असेल तर नक्कीच पोलिसांना संपर्क करा असे आवाहन सायबर सेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदुकिशोर मोरे यांनी केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांद मर्दे आणि महिला पोलीस कर्मचारी लता मोरे यांनी आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी केली. इन्स्टाग्रामवरून होणारा छळ आणि आरोपीला पकडण्याची हे पहिलेच प्रकरण आहे, हे विशेष.