पनवेल नगरपालिकेच्या परिवहन सेवेचा बस डेपो करंजाडे येथे होणार असल्याने या परिसराला आता महत्त्व येऊ लागले आहे. पालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर बेलापूर, खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेलच्या कोणत्याही भागातून करंजाडे येथे पोहचणे सहजशक्य होणार असल्याने गुंतवणूकदार या परिसराकडे आर्कर्षित होत आहेत. त्यामुळे एक-दोन वर्षांपूर्वी असलेला १५०० ते २००० रुपये प्रतिचौरस फुटांचा भाव आता चार हजारांच्या आसपास गेला आहे.
पनवेल नगरपालिकेने परिवहन सेवेच्या आगारासाठी करंजाडे येथे पावनेदोन एकरचा भूखंड राखीव ठेवला आहे. येत्या दिवाळीपर्यंत ही परिवहन सेवा सुरू होत असल्याने तेथील जागांचा भाव आणखी वाढण्याच्या शक्यतेने आतापासूनच गुंतवणूकदारांची पावले तेथे वळत आहेत. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ व चारही बाजूने रस्त्याने जोडले गेल्यामुळेच हा परिसर हॉटस्पॉट ठरत आहे.  
पनवेल नगरपालिकेने परिवहन सेवेसाठी प्रस्तावित आराखडय़ात करंजाडे येथील भूखंड क्रमांक ५०८ व ५२० यावर डेपो उभारण्याचे ठरविले आहे. आगारासाठी पालिकेने तीन कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जोपर्यंत करंजाडे येथील आगाराचे काम होत नाही. तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून पनवेल न्यायालयाच्या मागील ५ एकरावर बसशेड उभारण्यात येईल. यामुळे कालपर्यंत कोणतीही वाहतुकीची सुविधा नसलेल्या करंजाडे परिसराला अचानक वाहतुकीचे साधन मिळाले आहे. पनवेल शहर, बेलापूर, उलवे, कामोठे, खांदा कॉलनी या वसाहतीपासून काही अंतरावर असलेल्या करंजाडे परिसरात सध्याही बांधकाम व्यवसाय सुरू आहे. परंतु वाहतुकीची सोय नसल्याने येथे घर घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते.
पनवेल पालिकेच्या परिवहनाचे मुख्य केंद्र हा परिसर होत असल्याच्या बातमीने आता नवीन घरे घेणाऱ्यांची या परिसरासाठीची चौकशी वाढल्याचे सुप्रीम बिल्डरच्या वतीने सांगण्यात आले. सद्य:स्थितीत करंजाडे येथे चार मजली इमारतीमध्ये फ्लॅटसाठी प्रतिचौरस मीटर ३ हजार ७०० व बारा मजली इमारतीमधील फ्लॅटसाठी ४ हजार २०० रुपयांचा प्रतिचौरस मीटरचा दर आकारला जातो. बसडेपोच्या बातमीमुळे येथील विकासक लॉबी येथील घरांचे भाव वाढविण्याच्या मार्गावर असल्याचेही समजते. बसडेपो उभारणी आणि प्रत्यक्षात बससेवेला सुरुवात होण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात येते. मात्र या मार्गावरून प्रत्यक्षात नगरपालिकेच्या परिवहन सेवेची पहिली बस धावू लागल्यानंतर घरांचे हेच दर उंचावणार आहेत.