मतदानादरम्यान तणाव उत्पन्न होण्याच्या यापूर्वीच्या घटना लक्षात घेऊन यावेळी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात एकाही राजकीय पक्षाचे कार्यालय उभे राहू न देण्याची ताकीद जिल्ह्य़ातील निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या विशेष कार्यशाळेत याविषयी स्पष्ट निर्देश दिलेत.  यावेळी मतदान केंद्राबाबत दक्ष राहण्याचे प्रामुख्याने बजावण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सात हजार अधिकारी व कर्मचारी, दीडशे निरीक्षक, १६६ निवडणूक निरीक्षक, दोनशेवर व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले आहे. निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण असते. त्यांनी प्रत्येक मतदान केंद्राची तपासणी वारंवार करावी. मतदारांच्या सुविधा तपासाव्या. अतिसंवेदनशील कें द्रावर निगराणी ठेवावी. विविध मतदान केंद्रातील समन्वय साधणारा आराखडा तयार करावा.  मतदारांना मतदान करण्यापासून विशिष्ट भागात मज्जाव केल्या जात असेल तर यावेळी त्वरित पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी.
७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेल्या कें द्राबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा करू नये. तसे झाल्यास पक्षपातीपणाचा ठपका ठेवल्या जाईल. यासंदर्भात आठ समित्यांचे गठन करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारीपथक ठेवण्यात येणार आहे. उमेदवाराकडून दिवभरातील खर्चाचा हिशोबाची एक कच्ची व एक पक्की प्रत घेण्याबाबत दक्ष असावे. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी केल्या. निवडणूक कार्यात वेळेवर सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलट पेपरची व्यवस्था केली जाणार आहे.  निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर ७५ परवानाधारक बंदुकी जमा करण्यात आल्या आहेत. गडबड करणाऱ्या साडेतीनशे व्यक्तींना समज देण्यात आला असून १७५ अजामिनपात्र आदेश जारी करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १८२ फ लक, २६ कटआउट, ५७० पोस्टर्स ४३० बॅनर्स व ४५० अन्य प्रकारच्या जाहिराती जप्त करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक मतदान होण्यासाठी एनसीसी व अन्य स्वयंसेवी संघटनांतर्फे  जागरण यात्रा काढल्या जाणार असून युवकांनी मतदानात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.