उरण तालुक्यातील शाळांचे निकाल लागले असून मुलांच्या सुटीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मात्र, उरण नगरपालिका हद्दीत असलेल्या बालोद्यानातील खेळणीच नादुरुस्त असल्याने मुलांना नादुरुस्त खेळण्यांवरच सुटीचा आनंद घेण्याची वेळ आली आहे.  शहरातील बालोद्यानात खेळणी खरेदीसाठी निविदा काढून खेळणी खरेदीची प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र मुलांची परीक्षा होऊन निकाल लागले आणि काही दिवसांचाच सुटीचा कालावधी उरलेला असतानाही नगरपालिकेला खेळणी मिळत नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या उरण नगरपालिकेच्या हद्दीत मोजून तीन बालोद्याने आहेत. त्यापैकी उरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावातील सानेगुरुजी बालोद्यान, बौद्धवाडा तसेच मांगिरदेव, मोरा परिसरात बालोद्यान आहेत. यापैकी बहुतेक बालोद्यानातील खेळणी गेली अनेक वर्षे बदलली गेलेली नाहीत. त्यामुळे येथील फायबरच्या घसरगुंडय़ा अनेक ठिकाणी फाटल्या असून तुटल्याने वेगाने येणाऱ्या मुलाला अपघात होण्याची शक्यता आहे, तर येथील पाळण्यांच्या साखळ्याही गंजल्या आहेत. त्यामुळे पाळणी न वापरताच पडून आहेत.
उरण शहरातील मुलांच्या संख्येच्या तुलनेत सानेगुरुजी बालोद्यानात असलेली खेळणी कमी आहेत, तर मोरा, बौद्धवाडा, मांगिरा विभागातील बालोद्यानातील खेळणीही खराब झालेली आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या हरिश्चंद्र गावंड उद्यानाला उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने ते  बंद आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता, खेळणी खरेदीच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लवकरच बालोद्यानात खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्याकरिता नगरपालिकेने पाच लाख रुपयांची तरतूद केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच गावंड उद्यानासंदर्भात वेळ ठरविण्यात आली असून चौकशी करून उद्यान सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.