उपनगरीय गाडय़ांचा वेग आणि फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सध्या मध्य रेल्वेवर डीसी (डायरेक्ट करंट) विद्युतप्रवाहाचे परिवर्तन एसी (अल्टरनेट करंट) विद्युतप्रवाहामध्ये करण्यात येत आहे. यासाठी पारसिकच्या बोगद्यातील रूळ खाली करण्यापासून जोरदार तयारीही सुरू आहे. मात्र या परिवर्तनाचा थेट फायदा अद्याप तरी उपनगरीय प्रवाशांना मिळणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सध्या डीसी-एसी परिवर्तन हे ठाणे आणि मुलुंडपर्यंतच होणार आहे. हे परिवर्तन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याचा फायदा उपनगरीय प्रवाशांना मिळणार नाही, असे मध्य रेल्वेतील एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर डीसीतून एसी परिवर्तन पूर्ण झालेले असले तरी प्रवासाचा वेळ सेकंदाने सुद्धा कमी झालेला नाही. उलट काही ठरावीक ठिकाणी गाडीतील दिवे आणि पंखे बंद होण्याची ‘असह्य काळ’ मात्र प्रवाशांच्या माथी बसला आहे.
कल्याणच्या पुढे कर्जत आणि कसारा या दोन्ही मार्गावर एसी विद्युतप्रवाह आहे. तसेच कल्याण ते ठाणे या टप्प्यात डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले आहे. धीम्या मार्गावर दोन्ही मार्गिकांवर कल्याण ते मुंब्रा या स्थानकांदरम्यान परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. तर जलद मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांवर हे काम कल्याण ते ठाणेदरम्यान पूर्ण होत आहे. त्यासाठी पारसिकच्या बोगद्यातील रूळ खाली घेण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. तर पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत एसी विद्युतप्रवाह कार्यरत आहे.
सध्या मध्य रेल्वेवर कार्यरत असलेल्या ७५ उपनगरीय रेल्वे गाडय़ांपैकी १५ गाडय़ा डीसी विद्युतप्रवाहावरच चालणाऱ्या आहेत. त्यामुळे या १५ गाडय़ा फक्त ठाण्यापर्यंतच चालवल्या जातात. उर्वरित ६५ गाडय़ा दोन्ही विद्युतप्रवाहावर चालतात. त्यामुळे ठाण्याच्या पुढे फेऱ्यांमध्ये वाढ करायची झाल्यास फक्त ६५ गाडय़ांचीच मदत होते. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत डीसी-एसी परिवर्तन झाल्यास ही अडचण येणार नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एमयुटीपी-२ या प्रकल्पात ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान डीसी-एसी परिवर्तनावर भर देण्यात आला आहे. मात्र हा परिवर्तन प्रकल्प एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वे एकत्रितपणे राबवणार आहेत. मध्य रेल्वेकडून त्यांच्या टप्प्याची पूर्तता झाल्यानंतर एमआरव्हीसी आपले काम सुरू करणार असल्याचे एमआरव्हीसीतील सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी बराच काळ जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिणामी, ठाण्यापर्यंतच पूर्ण झालेल्या डीसी-एसी परिवर्तनाचा फायदा प्रवाशांना होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
पश्चिम रेल्वेवर ‘डीसी-एसी’चा मनस्तापच!
पश्चिम रेल्वेवर फेब्रुवारी २०१२ मध्ये विरार ते चर्चगेटदम्यान डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले. त्यामुळे वर्षभरात ९५ सेवा वाढल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर ९ डबा गाडय़ाही इतिहासजमा झाल्या आहेत. त्यांचे डबे अन्य गाडय़ांना जोडून त्या गाडय़ांची वहनक्षमता वाढली. डीसी विद्युतप्रवाह १५०० व्ॉटचा असतो. मात्र एसी प्रवाह हा २५ हजार व्ॉटचा असल्याने जास्त भार घेणे ‘एसी’ प्रणालीत सहज शक्य होते, असे प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्षात मात्र डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.
डीसी-एसी परिवर्तन होण्याआधी चर्चगेट ते बोरिवली या प्रवासाला धीम्या गाडीने एक तास पाच मिनिटे लागत. फेब्रुवारी २०१२ नंतरही वेळापत्रकानुसार एवढाच वेळ लागणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या हे अंतर कापायला सव्वा तासापेक्षा जास्त वेळ लागतो. जलद गाडय़ांसाठी हा कालावधी ५० मिनिटे आहे. पण जलद गाडय़ा बोरिवलीला पोहोचायला १५-२० मिनिटे जास्त वेळ घेतात. त्याशिवाय या मार्गावर पाच ते सहा वेळा लाइट जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे डीसी-एसी परिवर्तनामुळे प्रवाशांना कोणताही फायदा झाला नसल्याचा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे. या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनानंतर खरोखरच प्रवाशांना फायदा होणार काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.