जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहे. येथील रहिवाशांवर पालिकेच्या दळभद्री कारभारामुळे शहरातून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात शहरवासीयांना पाणी देण्यासह या परिस्थितीवर उपाययोजना करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असून ऐपत नसतानाही तहान भागविण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. शहरवासीयांना पाणी पुरविण्याची नितांत गरज असतानाही सत्ताधारी काही नेते केवळ राजकारण आणि प्रसिध्दी स्टंट करण्याच्या मागे लागले आहेत. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या नावाखाली केवळ ठिकठिकाणी फोटो काढून उसना आव आणला जात आहे. एकीकडे जनतेला पाण्यासाठी  अतोनात हाल सोसावे लागत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते केवळ राजकीय स्वार्थापोटी आपापली पोळी शेकण्यातच व्यस्त आहेत. वास्तविक, नगर पालिकेपासून ते दिल्लीपर्यंत सत्ताधाऱ्यांची सत्ता असतानाही पालिका सत्ताधाऱ्यांना पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात पूर्णत: अपयश आले आहे.
या शहरावर दरवर्षीच पाणीटंचाईचे संकट ओढवते. असे असतानाही सत्ताधारी दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार करीत आहेत. दरवर्षीच कोणती ना कोणती नवीन योजना मंजूर केली जाते आणि तिचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागते. नेत्यांना श्रेय मिळते पण, जनसामान्यांना पाणी मात्र मिळत नाही. सध्या शहरातील नागरिकांना महिन्यातून एकदाच पाणी मिळत आहे. त्यामुळे जनतेला पाणीपुरवठा न करू शकणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांना आता सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावे, तसेच नागरिकांना त्वरित पाणीपुरवठा न झाल्यास सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल, माजी शहरप्रमुख सुनील भाग्यवंत, महिला आघाडी प्रमुख सिंधू खेडेकर, दिलीप चाफेकर, विलास येरमुले, गुलाब ठाक रे, प्रवीण दिल्लीवाले, मोहन टाकसाळ, टेनीसिंग सेटी, साहेबराव उबरहंडे, गणेश श्रीवास्तव, विकी बेंडवाल, स्वप्नील शास्त्री, छोटू सपकाळ, रमेश शिंदे, रवी भगत यांनी दिला आहे.