इम्रान हाशमी आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘घनचक्कर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांना नागपूरचे इंडस्ट्रीयल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगण्यातील घनचक्कर आडनाव असलेल्या १५ कुटुंबानी कायदेशीर नोटीस पाठविली असून चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची सूचना केली आहे. राजकुमार गुप्तांचा ‘घनचक्कर’ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला असून बऱ्यापैकी धंदा करीत आहे. मात्र, चित्रपटाच्या शीर्षकामुळे बदनामी होत असल्याच्या कारणाखाली या कुटुंबांनी दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस धाडण्याचा निर्णय घेतला. सेंन्सॉर बोर्ड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही यासंदर्भातील पत्र धाडण्यात आले आहे.
घनचक्कर या अर्थाचा विपर्यास करण्यात आल्याने आपल्या कुटुंबांची सार्वजनिक टर उडविली जात असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. हिंगण्याचे ज्येष्ठ नागरिक नाना घनचक्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याची माहिती दिली. घनचक्कर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आमच्या कुटुंबातील मुलांची शाळा आणि महाविद्यालयात टर उडविली जात असून आम्हाला जगणे कठीण झाले आहे, असेही घनचक्कर यांनी सांगितले. िहगणा ग्रामपंचायतीनेही घनचक्कर कुटुंबांना पाठिंबा दिला आहे. हिंगण्याचे उपसरपंच गिरीश देशमुख म्हणाले, हा मुद्दा आता विधानसभेत लावून धरण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार असून यासंदर्भात ठराव पारीत केल्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शकावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.